भीलगाव खैरीतील ‘अंकित पल्प्स अ‍ॅन्ड बोर्ड्स’ कंपनीत भीषण स्फोट; एक ठार, सहा जखमी

17 Jun 2025 16:20:22
 
Massive explosion
 (Image Source-Internet)
नागपूर (भीलगाव खैरी) :
नागपूर जिल्ह्यातील भीलगाव खैरी (Bhilgaon Khairi) परिसरात मंगळवारी सकाळी भीषण दुर्घटना घडली. येथील ‘अंकित पल्प्स अ‍ॅन्ड बोर्ड्स’ या मायक्रोक्रिस्टलाइन सेल्युलोज तयार करणाऱ्या कंपनीच्या डी-ॲक्शन विभागात अचानक स्फोट झाला. या स्फोटात एक कामगाराचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
स्फोटात मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव सुधीर कालबांडे (रा. कांद्री, कन्हान) असे आहे. तर जखमींमध्ये दिनेश टेबूरने, मंगेश राऊत, युनुस खान, स्वप्नदीप वैद्य आणि आशिष वाढगुळे यांचा समावेश आहे. यापैकी चार जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना कामठीच्या सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कंपनी व्यवस्थापनानुसार सकाळी सुमारे ९ वाजता, रिअ‍ॅक्टरमध्ये काम सुरू असताना अचानक स्फोट झाला आणि गरम पाण्याचा मारा कामगारांवर झाला. त्यामुळे काहीजण गंभीर भाजले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त निकेतन कदम, सहायक पोलीस आयुक्त, लेबर इन्स्पेक्टर आणि तहसीलदार यांनी घटनास्थळी भेट देत आढावा घेतला. सध्या न्यू कामठी पोलीस पुढील तपास करत आहेत.
ही कंपनी फार्मास्युटिकल एक्ससिपिएंट्स व अन्न पदार्थांसाठीचे घटक तयार करते. सतत होणाऱ्या अशा दुर्घटनांमुळे औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
Powered By Sangraha 9.0