(Image Source-Internet)
इराणमधील (Iran) तणावपूर्ण परिस्थितीमुळे सुमारे १५०० भारतीय विद्यार्थी तिथे अडकले असून, त्यांचा आपल्या कुटुंबीयांशी संपर्क तुटला आहे. इस्रायलने इराणवर जोरदार हवाई हल्ले सुरू केल्याने देशात आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. इंटरनेट सेवा बंद असल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
भारतासमोर पुन्हा संकट-
यापूर्वी युक्रेन युद्धादरम्यान भारतीय विद्यार्थी अडकले होते आणि त्यांना एअर इंडियामार्फत विशेष मोहिमेद्वारे परत आणण्यात आलं होतं. आता इराणमधील परिस्थितीही तशीच गंभीर झाल्याने पुन्हा भारत सरकारकडून तातडीने पावलं उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
बहुतांश विद्यार्थी काश्मीरमधील; काहीजण जखमी-
इराणमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर काश्मीरमधील युवक आहेत. इस्रायलच्या हल्ल्यात काही विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. ‘हजत दोस्त अली’ हॉस्टेलवर झालेल्या बॉम्बहल्ल्यात काश्मिरी विद्यार्थ्यांना इजा झाली आहे.
पालकांचे आक्रोश –
विद्यार्थ्यांशी फोनवर संपर्क होणं अत्यंत कठीण झालं आहे. “केवळ एक फोन लागतो, तोही अनेक वेळा प्रयत्न केल्यावर,” अशी तक्रार पालकांनी केली. त्यांनी भारत सरकारकडे विनंती केली आहे की, लवकरात लवकर विशेष विमाने पाठवून विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे परत आणावं.
इतर देशांनी उचलले पावलं, भारताकडूनही अपेक्षा-
इराक आणि पाकिस्तानने त्यांच्या देशातील नागरिकांना आधीच सुरक्षित बाहेर काढलं आहे. भारताकडूनही लवकरच पावलं उचलली जातील, अशी पालकांना आशा आहे.