महायुतीच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी आत्महत्येस प्रवृत्त – वडेट्टीवार यांचा महायुतीवर हल्लाबोल

14 Jun 2025 15:24:11
 
Vijay Wadettiwar
 (Image Source-Internet)
नागपूर :
महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यांचे केंद्र बनले आहे. महायुती सरकारच्या खोट्या आश्वासनांमुळे आणि चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी आत्महत्येस प्रवृत्त होत आहेत," अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केली. नागपुरात बोलताना वडेट्टीवार यांनी प्रहारचे नेते बच्चू कडू यांच्या आंदोलनाला काँग्रेसने पाठिंबा दिला असल्याचे स्पष्ट केले.
 
वडेट्टीवार म्हणाले, "जे कोणी शेतकऱ्यांसाठी लढतील, त्यांच्या मागे आम्ही उभे राहू. बच्चू कडू यांचे आंदोलन शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आहे, त्यामुळे काँग्रेस त्यांना पूर्ण पाठिंबा देते." रोहित पवार महाविकास आघाडीच्या वतीने मोझरीत बच्चू कडूंना भेटले आणि काँग्रेसने आधीच आपली भूमिका स्पष्ट केली होती, असेही त्यांनी सांगितले.
 
कर्जमाफीसाठी सरकारने समिती स्थापन केल्याच्या निर्णयावरही वडेट्टीवार यांनी टीका करत म्हटले की, "ही फक्त वेळ मारून नेण्याची आणि लोकांना फसवण्याची टुमणी आहे. आम्ही २०१९ मध्ये सत्तेत आल्यावर ३९,००० कोटींची कर्जमाफी केली होती. आमचे धोरण नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आधार देण्याचे होते."
 
ते पुढे म्हणाले, "गेल्या दोन वर्षांपासून नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी अडचणीत आहेत. सरकारने त्यांना काहीही मदत केलेली नाही. शेतकऱ्यांना मरणाच्या उंबरठ्यावर सोडून हिंदू-मुस्लिम करत लोकांचे भले कसे होणार?"
 
वडेट्टीवार यांनी सरकारवर जमीन देणगीप्रकरणीही निशाणा साधला. "आम्हाला १४,००० कोटी रुपये उभारण्यासाठी उत्पादन शुल्क वाढवावे लागले, आणि सरकार मात्र मुंबईत लाखो कोटींची जमीन अदानींना देत आहे," असा आरोपही त्यांनी केला.
Powered By Sangraha 9.0