नागपूरमध्ये आकारास येतोय देशातील खासगी हेलिकॉप्टर उद्योगाचा नवा अध्याय; ८ हजार कोटींचा मॅक्स एरोस्पेस प्रकल्प

    14-Jun-2025
Total Views |

Max Aerospace project(Image Source-Internet)  
मुंबई :
नागपूरच्या औद्योगिक नकाशावर आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उमटणार आहे. मॅक्स एरोस्पेस (Max Aerospace) अँड एव्हिएशन प्रा. लि. ही खासगी कंपनी राज्य सरकारच्या सहकार्याने नागपूरमध्ये ८ हजार कोटी रुपयांचा हेलिकॉप्टर उत्पादन प्रकल्प उभारणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत या ऐतिहासिक सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
 
या प्रकल्पामुळे नागपूरचं नाव देशातील महत्त्वाच्या एरोस्पेस केंद्रांमध्ये घेतलं जाईल. कंपनी इथे अत्याधुनिक रोटरी विंग हेलिकॉप्टर्सचं उत्पादन, कस्टमायझेशन, फ्लाइट टेस्टिंग आणि इंटिग्रेशन करणार आहे. नागपूर विमानतळाजवळ हे उत्पादन केंद्र उभारले जाणार असून, सर्व आवश्यक लॉजिस्टिक सुविधा आणि पायाभूत सुविधा याठिकाणी उपलब्ध असतील.
 
रोजगार, गुंतवणूक आणि भविष्यातील संधी-
२०२६ पासून प्रत्यक्ष काम सुरू होणार असलेल्या या प्रकल्पामुळे थेट व अप्रत्यक्ष मिळून २ हजारांहून अधिक रोजगारनिर्मिती होणार आहे. कंपनीने आठ वर्षांत सुमारे ८ हजार कोटींची गुंतवणूक करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
 
मॅक्स एरोस्पेसने नागपूरची निवड केली ही राज्यासाठी अभिमानाची बाब आहे. महाराष्ट्राला एरोस्पेस क्षेत्रात जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्याची क्षमता आहे. सरकारकडून या प्रकल्पाला सर्वतोपरी सहकार्य मिळेल," असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
 
मॅक्स एरोस्पेसचे अध्यक्ष भरत मलकानी यांनी, “मी स्वतः महाराष्ट्राचा असून हा प्रकल्प माझ्या मातीत उभारणे माझ्यासाठी गर्वाची बाब आहे. राज्य सरकारकडून मिळालेल्या मदतीमुळे आमचा विश्वास दुणावला आहे,” असे सांगितले.
 
मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या समारंभात उद्योग विभागाचे सचिव पी. अन्बलगन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सीईओ पी. वेलरासू आणि कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
 
नागपूरच्या विकासाच्या दृष्टीने ‘गेम चेंजर’ ठरणारा हा उपक्रम केवळ रोजगारनिर्मिती नव्हे, तर आधुनिक भारताच्या संरक्षण आणि विमानचालन क्षेत्रातही महाराष्ट्राचं वर्चस्व अधोरेखित करणारा ठरेल.