(Image Source-Internet)
नागपूर :
नागपूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी हालचालींना वेग दिला असून, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट)नेही आपली रणनिती स्पष्ट केली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पक्ष १०० जागांवर उमेदवार उभे करण्याच्या तयारीत असल्याचा दावा केला आहे.
“नागपूर महापालिकेच्या १५१ जागांपैकी आम्ही सध्या १०० जागांवर तयारी करत आहोत,” असे देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. “संघटन बळकट करण्यावर आमचा भर असून, आम्ही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून थेट जनतेशी संपर्क साधत आहोत,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
देशमुख यांनी सांगितले की, निवडणूक महाविकास आघाडीतून लढण्याचा निर्णय घेण्यात आला असून, आघाडीत जागावाटपाची चर्चा समन्वयाने केली जाईल. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्यातील आघाडी आगामी निवडणुकीत महत्त्वपूर्ण ठरेल, असे त्यांनी सूचित केले.
निवडणुका निश्चित होणार का, याबाबतही अनिल देशमुख यांनी शंका व्यक्त केली. "ही तर निवडणुकीच्या तयारीची सुरुवात आहे. सध्या जिल्हा परिषदांवर प्रशासक आहेत. त्याच लोकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे निवडणुका होणार की नाही, यावरही प्रश्नचिन्ह आहे," असे ते म्हणाले.
देशमुख यांनी स्पष्टपणे नमूद केले की, "एकदा वॉर्ड रचना पूर्ण झाली की निवडणुका पुढे ढकलल्या जात नाहीत, हे सरकारने लक्षात घ्यावे." त्यामुळे नागपूर महापालिकेच्या निवडणुकीबाबत त्यांच्या भूमिकेला अधिक वजन प्राप्त झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने थेट १०० जागांवर दावा करून नागपूरमध्ये राजकीय रंगत वाढवली असून, आघाडीत जागावाटप कसे होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीच्या आक्रमक तयारीमुळे नागपूरमध्ये चुरस वाढणार, हे निश्चित मानले जात आहे.