करिश्मा कपूरच्या एक्स पतीचे निधन; संजय कपूरला खेळादरम्यान हृदयविकाराचा झटका

    13-Jun-2025
Total Views |
 
Sanjay Kapoor
 (Image Source-Internet)
मुंबई :
बॉलिवूडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेत्री करिश्मा कपूर यांचे माजी पती संजय कपूर (Sanjay Kapoor) यांचं वयाच्या ५३व्या वर्षी अचानक निधन झालं आहे. युकेमध्ये पोलो खेळत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि काही क्षणांतच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने कपूर आणि सचदेव कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.
 
खेळादरम्यानच घडला दुर्दैवी प्रकार-
संजय कपूर हे युकेमध्ये घोडेस्वारी पोलो स्पर्धेत सहभागी झाले होते. खेळ सुरू असतानाच त्यांना अस्वस्थ वाटले आणि ते मैदानावरच कोसळले. त्वरित वैद्यकीय मदत मिळवण्यात आली, मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आलं नाही. संजय कपूर हे ‘सोना कॉमस्टार’ या ऑटो पार्ट्स कंपनीचे अध्यक्ष होते. त्यांच्या जाण्याने व्यवसायिक वर्तुळातही हळहळ व्यक्त केली जात आहे.
 
मृत्यूपूर्वी विमान अपघातावर व्यक्त केली होती भावना-
निधनाच्या काही तास आधीच संजय कपूर यांनी अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघातावर ट्विटरवर संवेदना व्यक्त केल्या होत्या. त्यांनी लिहिलेलं हे ट्विट आता त्यांच्या शेवटच्या संदेशांपैकी एक ठरलं असून, सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.संजय कपूर आणि करिश्मा कपूर यांचा विवाह २००३ साली झाला होता. मात्र काही वर्षांत त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आणि २०१६ साली त्यांनी अधिकृतरीत्या घटस्फोट घेतला. त्यानंतर २०१७ मध्ये संजय कपूर यांनी प्रिया सचदेवसोबत दुसरा विवाह केला. त्यांना एक सात वर्षांचा मुलगा – अजारियस आहे. करिश्मा आणि संजय यांना दोन मुले – समायरा आणि कियान आहेत.
 
संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर-
संजय कपूर यांच्या अचानक मृत्यूमुळे त्यांच्या सर्व नातेवाईकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. एक संवेदनशील, कुटुंबवत्सल आणि यशस्वी उद्योजक अशी ओळख असलेल्या संजय कपूर यांचा असा अचानक एक्झिट अनेकांना अजूनही धक्का देणारा आहे.