अहमदाबाद विमान दुर्घटना; मृतांचा आकडा २९७ वर, मृतदेहांची ओळख ठरतेय आव्हानात्मक

    13-Jun-2025
Total Views |
 
Ahmedabad plane crash
 (Image Source-Internet)
अहमदाबाद:
अहमदाबादमध्ये (Ahmedabad) गुरुवारी दुपारी घडलेल्या भीषण विमान अपघातात मृतांचा आकडा २९७ वर पोहोचला आहे. एअर इंडियाच्या बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच अपघात झाला. या अपघातामुळे अनेक मृतदेह पूर्णपणे जळून खाक झाले असून, मृतांची ओळख पटवण्यासाठी डीएनए तपासणीचा आधार घेतला जात आहे.
 
अपघातात २४१ प्रवासी होते, यापैकी फक्त एक प्रवासी बचावला, ज्याने विमानातून उडी मारून आपले प्राण वाचवले. विमान अपघातानंतर जवळील वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहावर कोसळले, ज्यामुळे वसतिगृहातील २४ हून अधिक जणांचा मृत्यू झाला.
 
गुजरात पोलिसांचे उपायुक्त कानन देसाई यांनी सांगितले की, "जळालेल्या मृतदेहांची ओळख पटवणे कठीण होत आहे. त्यासाठी आम्ही डीएनए चाचणीचा आधार घेत आहोत." सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी तयारी सुरु आहे. शोक व्यक्त करणारे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहेत.
 
विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी देखील प्रवास करत होते, असं सांगितलं जात आहे. या अपघाताने संपूर्ण देशात शोक व्यक्त केला असून, सरकारकडून मदतकार्य जलद गतीने सुरू आहे. यासाठी प्रशासन आणि पोलिसांनी तातडीने मदत आणि तपास कार्य सुरु केलं आहे. पीडितांच्या कुटुंबीयांसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आले आहेत.