(Image Source-Internet)
राज्यात 'ऑपरेशन सिंदूर'वरून सुरू झालेला वाद थांबण्याचे नाव घेत नाही. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी या मोहिमेची तुलना "कॉम्प्युटर गेम"शी केल्यानंतर भाजपने काँग्रेसवर जोरदार टीका करत थेट पाकिस्तानशी संबंध जोडले. यावर आता काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपुरातून भाजपला कडवे उत्तर दिले आहे.
वडेट्टीवारांचा पलटवार-
विजय वडेट्टीवार म्हणाले, “ज्यांनी स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजांची साथ दिली, तेच आज आम्हाला पाकिस्तानशी जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना देशभक्तीचे प्रमाणपत्र देण्याचा अधिकार नाही.” त्यांनी स्पष्ट केलं की, एखादा शब्द चुकला असेल, परंतु नाना पटोलेंचा मूळ प्रश्न योग्य होता.
भाजपने लावले काँग्रेसवर देशद्रोहाचे आरोप-
नाना पटोले यांच्या वक्तव्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार टीका केली होती. त्यांनी म्हटले, “काँग्रेसचा हात पुन्हा पाकिस्तानसोबत असल्याचं स्पष्ट झालं आहे. ऑपरेशन सिंदूरसारख्या शौर्यगाथेवर प्रश्न उपस्थित करणं म्हणजे संपूर्ण देशाचा अपमान आहे.”
भारत कधी माफ करणार नाही-
बावनकुळे पुढे म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर हे फक्त एक लष्करी कारवाई नव्हे, तर ती अतिरेक्यांच्या अड्ड्यावर भारताच्या शौर्याची नोंद आहे. “नाना पटोलेंची मानसिकता देशविरोधी आहे, आणि काँग्रेसने पुन्हा एकदा भारताच्या स्वाभिमानाला काळिमा फासला आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.
राजकीय वातावरण तापले-
या आरोप-प्रत्यारोपांमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार शब्दयुद्ध सुरु असून, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या विषयावरून आणखी खळबळ उडण्याची शक्यता आहे.