केवळ एक मिनिट...अन् विमान कोसळलं; एअर इंडिया दुर्घटनेमागील कारण समोर !

    12-Jun-2025
Total Views |
 
Air India Plane crash
 (Image Source-Internet)
अहमदाबाद :
लंडनकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या (Air India) AI-171 या बोईंग 787-8 विमानाचा गंभीर अपघात अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या दोन मिनिटांत झाला. अपघाताचं कारण समोर आलं असून, उड्डाणानंतर लगेचच विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. पायलटकडे निर्णय घेण्यासाठी फक्त एक मिनिटाचा वेळ होता, पण विमान कमी उंचीवर असल्यामुळे तो काहीच करू शकला नाही.
 
झाडांवरून इमारतीवर आदळलं विमान-
विमानाचा मागचा भाग अचानक खाली झुकला आणि त्यामुळे ते झाडांवर आदळून थेट एका रहिवासी इमारतीवर कोसळलं. त्यानंतर जोरदार स्फोट होऊन भीषण आग लागली. ही आग इतकी तीव्र होती की धुराचे लोळ दोन किलोमीटर अंतरावरूनही स्पष्ट दिसत होते. दुर्घटनेत इमारती पूर्णतः जळून गेल्या असून, परिसरातील अनेक गाड्याही आगीत खाक झाल्या आहेत.
 
ब्लॅक बॉक्स शोध सुरू, जिवीतहानीची शक्यता-
अपघात रहिवासी भागात झाल्यामुळे जीवितहानीची शक्यता मोठी आहे. अद्याप घटनास्थळी मदत व बचावकार्य सुरू आहे. दुर्घटनेचं नेमकं कारण समजण्यासाठी ब्लॅक बॉक्स शोधण्याचं काम सुरू आहे, मात्र तो अजून मिळालेला नाही.
 
प्रवासी आणि नागरिकत्व तपशील-
या विमानात एकूण २४२ प्रवासी आणि कर्मचारी होते. त्यापैकी १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश, ७ पोर्तुगीज आणि १ कॅनेडियन नागरिक प्रवास करत होते. अपघातानंतर अनेक जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
हेल्पलाइन नंबर कार्यान्वित-
या घटनेनंतर एअर इंडियाने प्रवाशांच्या नातेवाईकांसाठी 1800 5691 444 हा हेल्पलाइन नंबर सुरू केला आहे, ज्यावरून अधिकृत माहिती दिली जात आहे.