(Image Source-Internet)
मुंबई :
महाराष्ट्राच्या राजकारणात नवे रंग भरू लागले असतानाच गुरुवारी सकाळी एक अप्रत्याशित घटना घडली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मुंबईतील वांद्रे येथील ताज लँड्स एण्ड हॉटेलमध्ये अचानक बैठक झाली. जवळपास एका तासाहून अधिक काळ ही चर्चा रंगली, मात्र या भेटीचा कोणताही अधिकृत तपशील समोर आलेला नाही.
ही गोष्ट समोर येताच राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून, मनसे आणि भाजप यांच्यात संभाव्य युतीबाबत चर्चेला नवसंजीवनी मिळाली आहे. विशेषतः मुंबई महापालिका तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट फारच महत्त्वाची मानली जात आहे.
ही युतीपूर्व तयारी?
ही बैठक पूर्वनियोजित होती की अचानक घडली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, यामागे काहीतरी गंभीर राजकीय गणितं असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे विरोधकही सतर्क झाले असून, भाजप-मनसे आघाडीच्या चर्चेला आता अधिक वेग मिळालाय.
राज-उद्धव एकत्र येणार?
दरम्यान, ठाकरे बंधूंमध्ये पुन्हा जवळीक निर्माण होणार का, हा प्रश्नही उपस्थित झाला आहे. यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी सूचक वक्तव्य करत म्हटले, "महाराष्ट्राच्या मनात जे आहे, तेच होणार." त्यांच्या या विधानामुळे राज आणि उद्धव एकत्र येतील का, यावर चर्चा पुन्हा पेटली आहे.
नव्या राजकीय समीकरणांची नांदी?
राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची ही गुप्त भेट केवळ शिष्टाचार होती की निवडणूकपूर्व युतीचा प्रारंभ, हे लवकरच स्पष्ट होईल. पण सध्या तरी या भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात हालचालींना वेग आला असून, नव्या समीकरणांची चाहूल लागली आहे.