उद्धव ठाकरे गटाला अमरावतीत मोठा धक्का; जिल्हाध्यक्ष सुनील खराटे समर्थकांसह भाजपमध्ये सामील!

    11-Jun-2025
Total Views |
 
Sunil Kharate
 (Image Source-Internet)
अमरावती :
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उबाठा) (Shivsena UBT) गटाला अमरावती जिल्ह्यात मोठा राजकीय धक्का बसला आहे. शिवसेना (उबाठा) चे अमरावती जिल्हाध्यक्ष सुनील खराटे यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह पक्षाला रामराम ठोकत भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला.
 
मुंबईत आयोजित विशेष कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बाणे आणि कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत खराटे यांना पक्षात औपचारिकरित्या सामावून घेण्यात आले. याच कार्यक्रमात शेतकरी सेनेचे राज्य समन्वयक अनिल लोहकपुरे यांनीही भाजपमध्ये प्रवेश करत नव्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली.
 
राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय-
सुनील खराटे हे अमरावती जिल्ह्यातील शिवसेनेतील महत्त्वाचे नेतृत्व मानले जात होते. त्यांच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरे गटाची जिल्ह्यातील ताकद कमकुवत झाली असून भाजपसाठी ही भर घालणारी बाब ठरली आहे. खराटे यांच्यासोबत अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही शिवसेनेला सोडचिठ्ठी देत भाजपचा झेंडा हाती घेतला आहे.
 
भाजपकडून स्वागत, शिवसेना उबाठाकडून मौन-
भाजपकडून या प्रवेशाला 'जनतेचा विश्वास' असल्याचे म्हणत स्वागत करण्यात आले. चंद्रशेखर बाणे यांनी सांगितले की, शिवसेना उबाठाचा खरा चेहरा उघड झाला आहे. खराटे यांच्यासारख्या लोकांनी भाजपमध्ये येणे हे जनतेचा भाजपवर असलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे.
 
दरम्यान, उद्धव ठाकरे गटाकडून या घडामोडींवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, पक्षाच्या अंतर्गत असलेल्या नाराजीच्या चर्चेला यानिमित्ताने उधाण आले आहे.