(Image Source-Internet)
मुंबई :
महायुतीच्या सत्तेच्या पार्श्वभूमीवर राज्यात विरोधी पक्षांतील नेत्यांचे भाजपकडे वळण्याचे प्रमाण वाढले आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते आणि पाटण विधानसभा मतदारसंघातील भाजपचे कट्टर विरोधक सत्यजितसिंह पाटणकर (Satyajitsinh Patankar) यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे भाजपमध्ये खळबळ उडाली असून पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांची संतापजनक प्रतिक्रिया समोर आली आहे.
पारंपरिक विरोधक भाजपमध्येच!
शंभूराज देसाई आणि सत्यजितसिंह पाटणकर हे पाटण मतदारसंघातील जुने राजकीय प्रतिस्पर्धी आहेत. 2024 च्या निवडणुकीत दोघांमध्ये थेट लढत झाली होती. देसाई यांनी १.२५ लाखांहून अधिक मते मिळवून पाटणकर यांचा ३४,८२४ मतांनी पराभव केला होता. पाटणकर हे यापूर्वीही अपक्ष म्हणून निवडणूक लढले होते.
देसाई नाराज, फडणवीस-शिंदेंची भेट घेणार
सत्यजितसिंह पाटणकर यांचा भाजप प्रवेश झाल्याच्या पार्श्वभूमीवर शंभूराज देसाई यांनी नाराजी व्यक्त करत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचं सांगितलं. “मी एक शिस्तबद्ध शिवसैनिक आहे. त्यामुळे माझं मत पक्षश्रेष्ठींना समोर मांडेन. आवश्यकता वाटल्यासच माध्यमांशी बोलेन,” असं देसाई म्हणाले.
जुने मतभेद, नवी इनकमिंग
1980 साली बाळासाहेब देसाई यांच्या विरोधात पाटणकर कुटुंबीयांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे तिन्ही पिढ्यांत राजकीय मतभेदांचा इतिहास आहे. अशा पार्श्वभूमीवर सत्यजितसिंह पाटणकर यांचा भाजपप्रवेश देसाई यांच्या अस्वस्थतेचं कारण ठरला आहे.