मायो रुग्णालयाजवळील टॉयलेटमध्ये गळफास घेतलेल्या इसमाचा मृतदेह आढळला; तपास सुरू

11 Jun 2025 20:05:37
 
Man found
 (Image Source-Internet)
नागपूर :
शहरातील मायो रुग्णालयाच्या (Mayo Hospital) ओपीडीजवळील सार्वजनिक शौचालयात मंगळवारी (१० जून) सायंकाळी साडेआठच्या सुमारास एका मध्यमवयीन पुरुषाचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.
 
मृत व्यक्तीस तात्काळ डॉक्टरांकडे नेण्यात आले, मात्र तपासणीनंतर त्याला मृत घोषित करण्यात आले. अद्यापही संबंधित व्यक्तीची ओळख पटलेली नाही.
 
पोलीसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत इसमाचे वय सुमारे ४५ वर्षे असून तो मध्यम बांध्याचा, उंची सुमारे ५ फूट आहे.
त्याचा रंग काळसर, चेहरा गोलसर, डोळे काळे, केस लहान आणि काळे होते. त्याच्या चेहऱ्यावर काळसर-पांढऱ्या रंगाची पातळ दाढी व मिशा होत्या. त्याने अंगात पांढऱ्या फुलांचे डिझाईन असलेला काळा फुल स्लीव्ह शर्ट, काळी फुलपँट आणि आतील कपडे परिधान केले होते. पोटाच्या उजव्या बाजूस जुन्या व्रणाचे तसेच उजव्या हातावर फ्रॅक्चरचे खुणा आढळून आल्या.
 
ही घटना रुग्णालयातील सुरक्षा रक्षक ऋषभ सुरेश पोहकार (२९, रा. लकडगंज) यांच्या लक्षात आली. त्यांनी दिलेल्या माहितीवरून तहसील पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भगत यांनी अपघाती मृत्यूची नोंद घेतली असून याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
Powered By Sangraha 9.0