बाबा सिद्दीकी हत्याकांडात मोठा ट्विस्ट; मुख्य सुत्रधार जस्सी पुरेवाल कॅनडात गजाआड

    11-Jun-2025
Total Views |
 
Baba Siddiqui murder case
 (Image Source-Internet)
मुंबई :
माजी आमदार बाबा सिद्दीकी (Baba Siddiqui) यांच्या हत्येप्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले असून, या गुन्ह्यामागचा कथित मास्टरमाइंड जीशान अख्तर ऊर्फ जस्सी पुरेवाल याला अखेर कॅनडातील सरे पोलिसांनी अटक केली आहे.
 
१२ ऑक्टोबर २०२४ रोजी वांद्रे येथील कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर मुख्य आरोपी जीशान अख्तर फरार झाला होता आणि तो पाकिस्तानातील गुंड शहजाद भट्टीच्या मदतीने कॅनडात पलायन झाल्याचे समोर आले होते.
 
गँगस्टर कनेक्शन उघड-
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, जीशान अख्तर पंजाबमधील जालंधरचा रहिवासी असून त्याचे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीशी थेट संबंध आहेत. त्याच्या अटकेमुळे संपूर्ण हत्याकांडाचा आंतरराष्ट्रीय कट समोर आला असून, त्याच्या भारत प्रत्यार्पणाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.
 
हत्येपूर्वी दीर्घ रेकी; २६ जण अटकेत-
या गुन्ह्याशी संबंधित २६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीत आरोपींनी हल्ल्यापूर्वी एक महिना सिद्दीकी यांची रेकी केल्याचे निष्पन्न झाले आहे. हत्येतील मुख्य शूटर शिवकुमार गौतम यासोबतच लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याचाही या कटात सहभाग होता. अनमोलला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे, त्यामुळे प्रकरणाच्या आंतरराष्ट्रीय स्वरूपावर शिक्कामोर्तब झाले आहे.
 
मुंबई पोलिसांचा तपास निर्णायक टप्प्यावर-
गोळीबारानंतर गंभीर जखमी झालेल्या बाबा सिद्दीकी यांना तातडीने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर तपासाचे जाळे उभे केले. कॅनडात झालेली अटक ही तपासातील मोठी प्रगती मानली जात असून, संपूर्ण गुन्हेगारी नेटवर्क उघडकीस येण्याची शक्यता आहे.