(Image Source-Internet)
कऱ्हाड :
"मुंबईत सर्वाधिक झाडांची कत्तल ही आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) पर्यावरण मंत्री असताना झाली," असा गंभीर आरोप भाजपचे प्रवक्ते आशिष शेलार यांनी केला आहे. त्यांनी सांगितले की, ठाकरे यांनी प्रत्येक वर्षी ६ ते ७ हजार झाडं तोडून विकासकांना फायदा मिळवून दिला, त्यामुळे त्यांना पर्यावरणाविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
माध्यमांशी संवाद साधताना, आदित्य ठाकरे यांच्या एका ट्विटबाबत विचारणा झाल्यावर शेलारांनी ही प्रतिक्रिया दिली. बुधवारी कराड दौऱ्यावर असताना ते बोलत होते. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले आणि प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर उपस्थित होते.
'सबका साथ, सबका विकास' हीच भूमिका-
शेलार म्हणाले की, भाजपची ताकद वाढवण्याचा प्रयत्न सुरू असून त्यामुळेच पक्षाची व्याप्ती वाढते आहे. भाजप मजबूत झाला तरच महायुती मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उद्धव ठाकरे हेच खरे बेईमान-
महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या एकनाथ शिंदे गटात प्रवेशावर संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना शेलार म्हणाले, "त्यांनी बेईमानीची व्याख्या शिकावी लागेल. पाटील यांनी स्वेच्छेने प्रवेश केला आहे. परंतु, राजकारणातील सर्वात मोठी बेईमानी उद्धव ठाकरे यांनी केली, ते आमच्यासोबत निवडणूक लढले आणि नंतर सत्तेसाठी विरोधात गेले. त्यामुळे त्यांना 'बेईमान ऑफ महाराष्ट्र' असा किताब दिला पाहिजे."
अजित पवारांच्या वक्तव्यावर बगल-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या "मी खिशात पैसे घेऊन फिरतो काय?" या वक्तव्याबाबत विचारल्यावर, शेलार यांनी त्यावर कोणतीही थेट प्रतिक्रिया न देता 'मी त्याबाबत काही ऐकलेलं नाही' असे म्हणत विषय टाळला.