(Image Source-Internet)
सातारा/पुणे :
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चा २६ वा वर्धापन दिन पुण्यात मोठ्या उत्साहात साजरा होत असतानाच पक्षासाठी अडचणीत टाकणाऱ्या घडामोडी समोर आल्या आहेत. सातारा आणि सांगली जिल्ह्यांतील दोन बड्या नेत्यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश करून शरद पवार गटाला मोठा धक्का दिला आहे.
साताऱ्यातील पाटण तालुक्यातील ज्येष्ठ नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपच्या शिस्तबद्ध कार्यपद्धतीमुळेच हा निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. "तालुक्याचा विकास भाजपच्या माध्यमातूनच शक्य आहे. मागील काही काळात पक्षात गोंधळ आणि शिस्तभंग जाणवला, त्यामुळे आम्ही पराभव स्विकारावा लागला," असं पाटणकर म्हणाले.
याचबरोबर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या गावातील सरपंच सारिका योगेश पाटणकर यांनीही भाजपमध्ये प्रवेश करत राजकीय वर्तुळात आश्चर्य निर्माण केलं.
या प्रवेशप्रसंगी उपस्थित मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दोन्ही नेत्यांचे स्वागत करत म्हटले, "सत्यजित पाटणकर हे साताऱ्यातील हाडामासाचे नेतृत्व आहेत. त्यांच्या आगमनामुळे पक्ष अधिक बळकट होईल. आमचं ध्येय म्हणजे शासनाच्या योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवणं."
वर्धापन दिनाच्या दिवशीच अशा दोन महत्वाच्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने शरद पवार गटाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.