(Image Source-Internet)
पुणे :
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या २६व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित कार्यक्रमात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग मिळाला. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आपल्या पदातून मुक्त व्हावं, अशी इच्छा व्यक्त करून साऱ्यांचे लक्ष वेधले. मात्र, खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर स्पष्ट प्रतिक्रिया दिली – “जयंत पाटील यांनी राजीनामा दिला नाही, तसेच त्यांनी कोणतेही औपचारिक पत्र सादर केलेले नाही.”
पाटील यांनी पक्षात नव्या नेतृत्वाला वाव मिळावा, या उद्देशाने आपल्या पदावरील कार्यातून निवृत्तीचा विचार मांडला असून, अंतिम निर्णय शरद पवार यांनी घ्यावा, असं मत व्यक्त केलं. यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “हा केवळ त्यांचा वैयक्तिक विचार आहे. पक्षात यावर चर्चा होईल. त्यांनी राजीनामा दिला नसेल तर नवीन अध्यक्ष निवडीचा प्रश्नच निर्माण होत नाही.”
जयंत पाटील यांच्याबाबत बोलताना सुळे म्हणाल्या, “ते पक्षाचे अत्यंत अनुभवसंपन्न आणि निष्ठावान नेते आहेत. त्यांनी पक्ष वाढवण्यासाठी सातत्याने परिश्रम घेतले आहेत. त्यांच्या भाषणातून नक्की काय अर्थ काढायचा, हे स्पष्ट नाही. मात्र त्यांनी काही सूचना केल्या असतील, तर त्या पक्षात योग्य त्या व्यासपीठावर घेतल्या जातील.”
दरम्यान, जयंत पाटील यांच्या विधानामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, पक्षाच्या अंतर्गत हालचालींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
याच कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्याशी असलेल्या नात्याविषयीही भाष्य करत म्हटलं, मी आणि अजित पवार जन्मापासून एकत्र आहोत. आमचं नातं प्रेमाचं आणि पवित्र आहे. कुटुंब म्हणून आम्ही एकत्रच आहोत आणि यामध्ये कोणताही दुरावा नाही. पवार कुटुंबीयांवर झालेले संस्कार अमूल्य आहेत आणि ते बदलले जाण्याची शक्यता नाही.
तसंच, ‘हुंडाबळी’सारख्या गंभीर प्रकरणांबाबत जनजागृतीसाठी राज्यभर दौऱ्याचे नियोजन लवकरच करण्यात येणार असल्याचीही घोषणा सुळे यांनी यावेळी केली.