नागपूर महापालिकेची हरित उपक्रमांत महत्त्वाची भर; ८४ वर्ष जुन्या पिंपळाचे यशस्वी स्थलांतर

    10-Jun-2025
Total Views |
 
NMC
 (Image Source-Internet)
नागपूर :
पर्यावरण रक्षणाच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकत नागपूर महानगरपालिकेने (NMC) ८४ वर्षे जुन्या पिंपळवृक्षाचे सुरक्षितपणे स्थलांतर करण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. महापालिकेच्या ‘ट्री ट्रान्सप्लांटर’ यंत्राच्या मदतीने हा दुर्मीळ आणि उल्लेखनीय उपक्रम पार पाडण्यात आला.
 
महापालिकेच्या उद्यान व कार्यशाळा विभागाने शीतला माता मंदिराजवळील भांडेप्लॉट परिसरात असलेले हे वयोवृद्ध वृक्ष सावधगिरीने दुसऱ्या ठिकाणी हलवले. या महत्त्वपूर्ण मोहिमेसाठी महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, अपर आयुक्त वैष्णवी बी. आणि उपआयुक्त (उद्यान) गणेश राठोड हे प्रत्यक्ष उपस्थित होते.
 
‘ट्री ट्रान्सप्लांटर’ या अत्याधुनिक यंत्रासाठी जिल्हा नियोजन समितीकडून ५.४७ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या मशीनला आता परिवहन विभागाकडून अधिकृत नोंदणीही मिळाली आहे.
 
भांडेप्लॉट चौकात सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामात अडथळा ठरत असलेल्या ३० फूट उंच पिंपळाचे स्थलांतर ‘डकोटा’ कंपनीच्या या यंत्राद्वारे करण्यात आले. झाडाच्या मुळे व खोडांना इजा न पोहोचवता, अगदी तंतोतंत काळजी घेत हे झाड दुसऱ्या जागी रुजवण्यात आले.
 
राज्यात यापूर्वी ठाणे महापालिकेने अशा प्रकारचे यंत्र वापरले होते आणि नागपूर हे दुसरे शहर ठरले आहे. संपूर्ण प्रक्रिया रिमोट कंट्रोलच्या साह्याने पार पडली. प्रारंभी जेसीबीच्या सहाय्याने झाडाभोवती खड्डा खोदण्यात आला आणि नंतर ट्रान्सप्लांटरने झाड उचलून निश्चित केलेल्या ठिकाणी लावले.
 
या यंत्रात १६०० लिटर पाण्याची टाकी असून, पुनरारोपण दरम्यान झाडाच्या मुळांना आवश्यक आर्द्रता देण्यासाठी सातत्याने पाणी फवारले जाते. यामुळे वृक्षाची मुळे सुरक्षित राहतात आणि नवीन जागेत सहज रुजतात.
 
हा संपूर्ण उपक्रम पर्यावरणपूरक शहरनिर्मितीस चालना देणारा आणि इतर महापालिकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.