नागपुरात‘ऑपरेशन थंडर’अंतर्गत निंबस हुक्का पार्लरवर मध्यरात्री छापा

    10-Jun-2025
Total Views |
 
raid on Nimbus Hookah Parlour
 (Image Source-Internet)
नागपूर :
शहरातील अवैध हुक्का पार्लरवर कडक कारवाई करत नागपूर पोलिसांनी 'ऑपरेशन थंडर' (Operation Thunder) अंतर्गत शंकरनगरमधील निंबस लाउंज हुक्का पार्लरवर मध्यरात्री छापा टाकला. या धडक कारवाईत पार्लरच्या आत संभ्रांत घरातील काही तरुणींना हुक्का ओढताना रंगेहाथ पकडले गेले, तर पार्लरचा चालक समीर शेख याच्याविरुद्ध अंबाझरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री साधारण तीनच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, हा हुक्का पार्लर रात्री उशिरापर्यंत बेकायदेशीररीत्या सुरू असल्याचे निष्पन्न झाले होते. येथे गैरकृत्यांच्या संशयास्पद हालचालींसह उच्चभ्रू वर्गातील तरुण-तरुणींची वर्दळ दिसून येत होती.
 
छाप्यादरम्यान पोलिसांनी जेव्हा पार्लरमध्ये प्रवेश केला, तेव्हा दार आतून बंद होते आणि पार्लरमध्ये ग्राहकांची गर्दी होती. तंबाखू मिश्रित हुक्के विविध फ्लेवर्समध्ये ग्राहकांना पुरवले जात होते. कारवाईची चाहूल लागताच अनेक ग्राहकांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे काही काळ परिसरात अफरातफर झाली.
 
पोलिसांनी सर्व ग्राहकांना समज देत कठोर इशारा दिला, तर संचालक समीर शेख याच्यावर हुक्का बंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या परिसरात काही दिवसांपूर्वी एका हुक्का पार्लरच्या संचालकाची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर अशा ठिकाणी पोलिसांचे लक्ष अधिक तीव्र झाले आहे.
 
सहायक पोलिस आयुक्त सुनीता मेश्राम, वरिष्ठ निरीक्षक गजानन गुल्हाने आणि त्यांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली. नागपूर पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, ‘ऑपरेशन थंडर’ मोहीम पुढेही सुरू राहणार असून, अशा बेकायदेशीर अड्ड्यांवर कडक कारवाई केली जाईल.