नेतृत्व बदलाची नांदी? जयंत पाटील यांनी मागितली पदमुक्ती, शरद पवार घेणार अंतिम निर्णय

    10-Jun-2025
Total Views |
 
Jayant Patil
 (Image Source-Internet)
पुणे :
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या २६ व्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या कार्यक्रमात एक महत्त्वाची राजकीय घडामोड समोर आली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आपल्या पदावरून मुक्त होण्याची इच्छा जाहीरपणे व्यक्त केली. त्यांच्या या घोषणेमुळे सभागृहात क्षणभर खळबळ उडाली.
पाटील यांनी आपल्या भाषणात स्पष्टपणे सांगितले, “मागील सात वर्षांत प्रदेशाध्यक्ष या भूमिकेतून मी पक्षाचे काम पाहिले. शरद पवार साहेबांनी वेळोवेळी संधी दिली. मात्र, आता नव्या नेतृत्वाला वाव मिळावा, या विचाराने मी पदत्यागाची विनंती करत आहे.”
या घोषणेनंतर काही कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत घोषणाबाजी केली. मात्र, पाटील आपल्या निर्णयावर ठाम राहिले आणि अंतिम निर्णय पवार साहेबांच्या हाती सोपवला.
यानंतर शरद पवारांनी आपल्या भाषणात पाटील यांच्या भूमिकेचा उल्लेख करत सांगितले की, “जयंत पाटील यांनी पक्ष संघटनेसाठी केलेले काम लक्षणीय आहे. नव्या नेतृत्वाला संधी देण्याची त्यांची भूमिका सकारात्मक आहे. मात्र, पक्षात अशा महत्त्वाच्या निर्णयांसाठी मी एकटा निर्णय घेणार नाही. वरिष्ठ सहकाऱ्यांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल.”
पवार यांनी पक्षातील तरुण कार्यकर्त्यांना पुढे आणण्याचा इशाराही यावेळी दिला. “जिल्हा आणि तालुका स्तरावरही नव्या चेहऱ्यांना संधी द्यायला हवी. पक्षात हजारो कार्यकर्ते सक्षम असून, त्यांच्यावर नेतृत्वाची जबाबदारी देता येईल,” असे ते म्हणाले.
गेल्या काही आठवड्यांपासून प्रदेशाध्यक्षपदावरून चर्चा सुरू होत्या. काही अंतर्गत मतभेदांचाही अंदाज याआधी व्यक्त करण्यात आला होता. अशा पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांच्या पदत्यागाच्या संकेतामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाच्या दिशेने बदलाची सुरुवात होताना दिसत आहे.