अभिनेत्री जिनिलिया देशमुखचा वटपौर्णिमेनिमित्त खास थाट; रितेशसाठी व्रत, दिला प्रेमळ संदेश!

10 Jun 2025 19:43:33
 
Genelia Deshmukh
 (Image Source-Internet)
मुंबई :
आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्याच्या कामनेने आणि जन्मोजन्मी हाच जीवनसाथी मिळावा यासाठी वटपौर्णिमेचा सण अनेक स्त्रिया भक्तिभावाने साजरा करतात. अभिनेत्री जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) हिनेसुद्धा हा सण अगदी पारंपरिक पद्धतीने साजरा करत आपल्या पतीसाठी प्रार्थना केली.
 
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओत जिनिलिया घरातच ठेवलेल्या वडाच्या रोपट्याची पूजा करताना दिसते. पिवळ्या रंगाच्या आकर्षक ड्रेसमध्ये ती नटली होती. पूजेसाठी घरातल्या देवघरात सजावट करण्यात आली होती. "प्रिय नवरा... आय लव्ह यू, बस... वटपौर्णिमा" असा गोड संदेश देत तिने व्हिडिओ शेअर केला.
 
जिनिलिया आणि रितेश देशमुख हे महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय आणि प्रेमळ कपल म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नात्याचा आदर्श अनेकांसाठी प्रेरणादायक आहे. लग्नाला यंदा १३ वर्षे पूर्ण होत असताना, त्याआधी ते १० वर्ष एकमेकांच्या प्रेमात होते.
 
राहील आणि रियान ही दोन मुले असलेलं हे कुटुंब अनेक सण, परंपरा आणि संस्कृती जपताना नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. त्यामुळेच जिनिलियाला "महाराष्ट्राची लाडकी वहिनी" असं संबोधलं जातं.
 
वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर जिनिलिया लवकरच आमिर खानसोबतच्या 'सितारे जमीन पर' या चित्रपटात झळकणार आहे. त्यांच्या जोडीची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. तर रितेश देशमुख नुकताच 'हाऊसफुल ५' मध्ये दिसला असून, सध्या तो 'राजा शिवाजी' या ऐतिहासिक चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. जिनिलिया या चित्रपटाची निर्मातीसुद्धा आहे.
 
प्रेम, परंपरा आणि संस्कृतीचा सुंदर संगम असलेल्या या लाडक्या दांपत्याचं नातं आजही चाहत्यांच्या मनात खास स्थान राखून आहे.
Powered By Sangraha 9.0