(Image Source-Internet)
मुंबई :
भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) पुन्हा एकदा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. धाराशिव येथे झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून महायुतीत खळबळ उडाली असून, खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
कार्यक्रमादरम्यान नितेश राणे यांनी, “कुणी काहीही केलं तरी, सगळ्यांचा बाप म्हणून भाजपा मुख्यमंत्री आहे,” असं विधान केलं. त्यांच्या या बोलण्यावर शिवसेनेच्या नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आणि मंत्रिमंडळ बैठकीत देखील हा मुद्दा चर्चेला आला.
बैठकीदरम्यान शिवसेनेच्या मंत्र्यांनी, “आमचा बाप बाळासाहेब ठाकरे आहेत, तुमचा कोण?” असा थेट सवाल उपस्थित केला. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, “कोणाचाही बाप काढणं योग्य नाही. राजकारणात शब्दांचा अर्थ आणि त्याचा समाजावर होणारा प्रभाव महत्त्वाचा असतो.”
फडणवीस पुढे म्हणाले, “मी संबंधित मंत्र्यांशी बोललो आहे. त्यांनी सांगितलं की, त्यांच्या बोलण्याचा उद्देश तसा नव्हता, पण मी त्यांना स्पष्ट केलं की, तुमच्या बोलण्याचा अर्थ काय होता हे महत्त्वाचं नसून, लोकांना काय वाटतं हे जास्त महत्त्वाचं आहे.”
नितेश राणेंनी धाराशिवमधील स्थानिक शिवसेना नेत्यांना उद्देशून, जिल्हा नियोजन समितीच्या निधीवाटपाबाबत नाराजी व्यक्त करताना, भाजपचा मुख्यमंत्रीच अंतिम निर्णय घेणारा आहे, असं अधोरेखित केलं. तसेच, “कोणी कितीही ताकद लावली तरी, राज्यात भाजपचाच प्रभाव राहील,” असंही ते म्हणाले.
या सगळ्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये मतभेद वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या स्पष्ट इशाऱ्यानंतर नितेश राणेंची पुढची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.