पाकिस्तान हादरलं; लाहोर विमानतळाजवळ सलग तीन स्फोट

    08-May-2025
Total Views |
 
Lahore airport
 (Image Source : Internet)
लाहोर:
पाकिस्तानच्या लाहोर (Lahore) शहरात आज सकाळी एकामागोमाग तीन प्रचंड स्फोट झाल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. हे स्फोट वॉल्टन विमानतळ परिसरात, गोपाल नगर आणि नसराबाद या भागांमध्ये घडले. या स्फोटांनी संपूर्ण पाकिस्तानात तणावाचं वातावरण पसरलं असून, लष्कराच्या हालचालींना गती मिळाल्याचं वृत्त आहे.
 
स्फोटांनी लाहोर हादरलं; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण-
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हे स्फोट इतके तीव्र होते की आजूबाजूच्या इमारतींना हादरा बसला. स्फोटस्थळी तात्काळ अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापन पथक दाखल झालं असून, अद्याप स्फोटामागचं कारण स्पष्ट झालेलं नाही.
 
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर तणाव शिगेला-
या स्फोटांपूर्वी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ला करत ९ दहशतवादी तळ नष्ट केल्याची घोषणा केली होती. ही कारवाई पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून केली गेली. त्यानंतर काही तासांतच लाहोरमध्ये स्फोट झाल्याने दोन्ही घटनांमध्ये संभाव्य संबंधांवर चर्चा रंगली आहे.
 
सीमेवर युद्धसज्ज हालचाली-
घटनेनंतर पाकिस्तानने LOC आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर युद्धजन्य तयारी सुरू केली आहे. रणगाडे, शस्त्रसज्ज वाहने तैनात करण्यात आली असून, लाहोरकडे जाणाऱ्या सर्व उड्डाणांना स्थगिती देण्यात आली आहे. हवाई वाहतूक पूर्णपणे ठप्प असून, ‘NOTAM’ जारी करण्यात आला आहे. तसेच, सीमावर्ती गावांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं जात आहे.
 
दहशतवाद्याच्या अंत्ययात्रेला लष्करी संरक्षणामुळे संताप-
दरम्यान, लाहोरपासून काही अंतरावर असलेल्या मुरीदके येथे लष्कर ए तोयबाच्या एका दहशतवाद्याच्या अंत्ययात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे ही यात्रा पोलीस व लष्कराच्या संरक्षणाखाली पार पडली. या यात्रेत सहभागी असलेला हाफिज अब्दुल रौफ हे नाव विशेष लक्षवेधी ठरलं असून, त्याला लष्कराच्या अधिकाऱ्यांनी साथ दिल्याचं स्पष्ट झाल्यानं आंतरराष्ट्रीय पातळीवर टीका होत आहे.
 
स्फोटांमुळे निर्माण झालेला तणाव आणि भारत-पाक यांच्यात वाढलेलं तणावपूर्ण वातावरण यामुळे दोन्ही देशांतील संबंध नव्या वळणावर पोहोचण्याची शक्यता आहे.