तेलंगणा जंगलात तुफान चकमक;नक्षल हल्ल्यात भूसुरुंग स्फोटात तीन जवान शहीद

    08-May-2025
Total Views |
 
Naxal attack
 (Image Source : Internet)
तेलंगणा :
छत्तीसगड आणि तेलंगणाच्या (Telangana) सीमेलगत असलेल्या जंगलात सुरू असलेल्या नक्षलविरोधी मोहिमेदरम्यान गुरुवारी भीषण नक्षल हल्ला झाला. नक्षलवाद्यांनी घडवलेल्या आयईडी भूसुरुंग स्फोटात तीन जवान वीरमरण पावले, तर आणखी तीन जण गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर परिसरात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक सुरु झाली आहे.
 
ही घटना तेलंगणाच्या मुलुगू जिल्ह्यातील घनदाट जंगलात घडली. नक्षलवादी लपून बसल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर ग्रेहाऊंड कमांडो आणि पोलिसांनी संयुक्त शोध मोहीम हाती घेतली होती. जवान जंगलात पोहोचताच नक्षलवाद्यांनी आयईडीचा स्फोट घडवून आणला.
 
स्फोटात तिघेजण शहीद झाले. त्यानंतर जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात आणखी तीन जवान जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
 
या घटनेनंतर छत्तीसगडमधील सुरक्षा यंत्रणा सतर्क करण्यात आल्या असून सीमेलगतच्या जंगलांमध्ये गस्त वाढवण्यात आली आहे. विशेष म्हणजे या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, ७ मे रोजी छत्तीसगडच्या कर्रेगुट्टा जंगलात झालेल्या चकमकीत २२ नक्षलवादी ठार झाले होते. २१ एप्रिलपासून ‘मिशन संकल्प’ अंतर्गत मोठ्या प्रमाणावर नक्षलविरोधी मोहीम राबवली जात आहे.
नक्षलविरोधी लढ्यात सुरक्षादलांनी मोठं यश मिळवलं असलं तरी त्याची किंमत जवानांच्या प्राणांनी चुकवावी लागत आहे, हे वास्तव पुन्हा एकदा उघड झालं आहे.