(Image Source : Internet)
कोल्हापूर :
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश देत येत्या चार महिन्यांत निवडणुका घेण्यास सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात राजकीय हालचालींना प्रचंड गती मिळाली आहे. विविध पक्षांत अंतर्गत कुरबुरी, नाराजी आणि गटबाजी पुन्हा एकदा उफाळून आली असून, काँग्रेसमध्ये नाराज नेत्यांना शिंदे गटाने खुले आमंत्रण दिल्याने सत्ताकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
काँग्रेसमध्ये नाराजी, शिंदे गटाची हालचाल-
गेल्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे राजेश क्षीरसागर विजयी झाले होते. यामुळे काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांना मोठा धक्का बसला होता. आता त्याच धक्क्याची पुनरावृत्ती होणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण काँग्रेसमध्ये उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेले अनेक माजी नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती आहे.
शारंगधर देशमुखांसह अनेक बंडखोर शिंदे गटाच्या संपर्कात?
महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख हे विधानसभा तिकीट न मिळाल्याने पक्षापासून दूर राहिले आहेत. आता त्यांच्याशी शिंदे गट, तसेच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने संवाद साधल्याचे समजते. देशमुख यांच्या गटात तीसपेक्षा जास्त माजी नगरसेवक असून, त्यातील काहीजणांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
सतेज पाटलांसमोर गड वाचवण्याचे आव्हान
पूर्वी महापालिकेवर पाच वर्ष सत्ता राखण्यात यशस्वी ठरलेले सतेज पाटील, आता मात्र त्यांच्या सोबतीला असलेले नेते आणि कार्यकर्तेच पाठी फिरवत असल्याचे चित्र दिसत आहे. काँग्रेसमध्ये असलेली ही अस्वस्थता कमी करण्यासाठी स्नेहभोजनाची योजना आखण्यात आल्याचे समजते. मात्र, शिंदे गटाच्या गुप्त हालचालींमुळे सतेज पाटलांसाठी राजकीय समीकरणे सांभाळणे अधिकच कठीण झाले आहे.
दरम्यान कोल्हापुरातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अत्यंत चुरशीच्या आणि नाट्यमय घडामोडींनी भरलेल्या असतील, यात शंका नाही. काँग्रेसमधील बंडखोरी, शिंदे गटाचे आमिष आणि महायुतीची वाढती ताकद पाहता, सतेज पाटलांना आता केवळ राजकीय नेतृत्वच नव्हे तर संघटन कौशल्यही दाखवावे लागणार आहे.