(Image Source : Internet)
मुंबई :
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राजकीय भवितव्यासंदर्भात मोठं वक्तव्य करत शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षात अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटासोबत पुन्हा एकत्र येण्याच्या विचारांची कबुली दिली आहे. एकत्र येण्यासंदर्भात सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी बसून निर्णय घ्यावा, असा स्पष्ट संदेश शरद पवारांनी दिला आहे.
शरद पवार म्हणाले,पक्षात सध्या दोन मते आहेत. एक गट पुन्हा एकत्र यावं असं मानतोय, तर दुसऱ्यांना वाटतं की भाजपसोबत थेट किंवा अप्रत्यक्षपणे जाणं टाळावं आणि इंडिया आघाडीतून पर्याय तयार करावा.
त्यांनी स्पष्ट केलं की, संसदेत विरोधी बाकांवर बसायचं की नाही, हा निर्णय सुप्रिया सुळे घेतील. याशिवाय त्यांनी सांगितलं की, माझे खासदार एकमताचे आहेत, पण आमदारांमध्ये अस्वस्थता असू शकते. मी निर्णय प्रक्रियेत दूर आहे. पक्षात धोरणात्मक निर्णय जयंत पाटील घेत आहेत.
पक्षाच्या पुनर्रचनेविषयी बोलताना पवार म्हणाले की, इंडिया आघाडी सध्या निष्क्रिय आहे. त्यामुळे नव्या ताकदीने पक्षाची पुनर्बांधणी, तरुण नेतृत्वाची जोपासना आणि पक्षसंघटना मजबूत करणं गरजेचं आहे.
पुतण्याशी भेटीवर त्यांनी स्पष्ट केलं की, त्या भेटी राजकीय नव्हत्या. “शैक्षणिक आणि अन्य संस्थांमधून आमचं एकत्र काम सुरू आहे. एनडीएसोबत, डाव्या पक्षांसोबतही आम्ही काम करतो आणि करत राहू,असं पवार म्हणाले.पवारांच्या या वक्तव्यामुळे आगामी महिन्यांत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा राजकीय समिकरण तयार होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.