भारतीय संघाला मोठा धक्का; रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती

    08-May-2025
Total Views |
 
Rohit Sharma
 (Image Source : Internet)
मुंबई :
भारतीय क्रिकेटमधून एक मोठी बातमी समोर आली असून, टीम इंडियाचा कसोटी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने कसोटी क्रिकेटमधून तात्काळ निवृत्तीची घोषणा केली आहे. रोहितने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम स्टोरीद्वारे याबाबतची माहिती दिली आणि चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला.
 
"सफेद जर्सीत देशाचं प्रतिनिधित्व करणं माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे," असे भावनिक उद्गार रोहितने आपल्या पोस्टमध्ये व्यक्त केले. आपल्या 280 क्रमांकाच्या कसोटी टोपीचा फोटो शेअर करत, त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे सांगितले.
 
टीम इंडियाच्या नेतृत्वाबाबत बदल होण्याची चर्चा सुरू असतानाच रोहितने निवृत्तीची घोषणा करत एकप्रकारे या वादांनाही पूर्णविराम दिला आहे.
 
रोहितची कसोटीतील धडाकेबाज कामगिरी-
२०१३ मध्ये इडन गार्डन्सवर वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण करणाऱ्या रोहितने आपल्या १२ वर्षांच्या कसोटी कारकीर्दीत एकूण ६७ सामने खेळले. या सामन्यांतील ११६ डावांमध्ये त्याने ४३०२ धावा फटकावल्या. त्याची सरासरी ४०.५८, तर स्ट्राइक रेट ५७.०८ इतकी राहिली. त्याने १२ शतकं, १८ अर्धशतकं आणि एक द्विशतक (२१२ धावा) झळकाले . रोहितने २०२२ ते २०२४ या कालावधीत भारतीय कसोटी संघाचं २४ सामन्यांत नेतृत्व केलं. त्यातील १२ विजय, ९ पराभव, आणि ३ सामने अनिर्णित राहिले. त्याची विजयी टक्केवारी ५७.१४% इतकी राहिली, जी कसोटी क्रिकेटसाठी लक्षणीय मानली जाते.
 
रोहित शर्मा याने याआधीच T20I क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली होती. आता कसोटी क्रिकेटलाही रामराम केल्यानंतर तो केवळ वनडे क्रिकेटमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करताना दिसणार आहे. भारतीय क्रिकेटसाठी हा एक युगाचा अंत म्हणावा लागेल, कारण रोहितसारखा सलामीवीर आणि अनुभवी नेता मिळणं संघासाठी सोपं नसेल.