(Image Source : Internet)
इस्लामाबाद :
भारताच्या "ऑपरेशन सिंदूर" मोहिमेमुळे पाकिस्तानात (Pakistan) मोठी खळबळ उडाली आहे. बुधवारी रात्री भारतीय लष्कराने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर जोरदार कारवाई करत किमान 9 प्रशिक्षण केंद्र नष्ट केली. या कारवाईमुळे पाकिस्तानची झोप उडाली असून, गुरुवारी रात्री त्यांनी भारतावर प्रतिहल्ल्याचा निष्फळ प्रयत्न केला. भारताने अत्याधुनिक S-400 क्षेपणास्त्र प्रणालीच्या साहाय्याने हे हल्ले यशस्वीरित्या परतवून लावले. या घडामोडींनंतर पाकिस्तानमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून, देशभरात भीतीचं सावट पसरलं आहे.
संसदेत खासदाराचे अश्रू अनावर-
या हल्ल्यांनंतर पाकिस्तानी संसदेतही भीतीचे आणि चिंता व्यक्त करणारे सूर उमटू लागले. एका संसद सदस्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तो भारताच्या कारवाईनंतर भावूक होऊन ढसाढसा रडताना दिसत आहे. “हे परमेश्वरा, आम्हाला या संकटातून मार्ग काढण्यासाठी शक्ती दे. आपण एकत्र आलो तरच यातून बाहेर पडू शकतो,” असं ते म्हणताना दिसले.
भारताकडून ५० हून अधिक ड्रोन हल्ले-
भारताने प्रतिउत्तरात पाकिस्तानातील 12 महत्त्वाच्या ठिकाणी सुमारे 50 ड्रोनद्वारे टार्गेट हल्ले केले आहेत. या कारवाईमध्ये अनेक लष्करी यंत्रणा, एअर डिफेन्स सिस्टीम आणि संवेदनशील ठिकाणं उद्ध्वस्त करण्यात आली. विशेष म्हणजे या पैकी काही हल्ले पाकिस्तानच्या अण्वस्त्र साठ्याजवळही करण्यात आले होते, ज्यामुळे पाक लष्करही हादरलं आहे. रावळपिंडीत मोठ्या प्रमाणात नागरिकांची धावपळ झाली असून, स्टेडियमसारखी रचना पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याची माहिती आहे.
विमानसेवा ठप्प, देशात आपत्कालीन परिस्थिती-
सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर लाहोर, कराची आणि इस्लामाबाद येथील विमानतळ तातडीने बंद करण्यात आले आहेत. देशभरात अलर्ट जारी करण्यात आला आहे आणि इस्लामाबादमध्ये उच्चस्तरीय सुरक्षा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ड्रोनच्या हल्ल्यामुळे इस्लामाबाद विमानतळावर उड्डाण बंदी लागू करण्यात आली.