(Image Source : Internet)
नागपूर :
शहरातील दाभा परिसरात मंगळवारी रात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे नागपूरकर सुन्न झाले. संशयाच्या गर्तेत अडकलेल्या एका युवकाने आपल्या प्रेयसीचा बेधडक खून केला. मृत महिला हेमलता वैद्य (३४) या एका नामांकित बिल्डरच्या ऑफिसमध्ये कार्यरत होत्या. आरोपी अक्षय दाते (२६) हाच तिचा जवळचा मित्र असल्याचे सांगितले जाते.
ही दुर्दैवी घटना गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील एका अपार्टमेंटच्या तळमजल्यात सायंकाळी साडेआठच्या सुमारास घडली. दररोजप्रमाणे हेमलता आपल्या कार्यालयात काम करत असताना अक्षय तिथे पोहोचला. तिथे एका अनोळखी पुरुषाला पाहून तो काही वेळासाठी निघून गेला. काही वेळाने परत आल्यावर त्याने अचानक लोखंडी सळईने हेमलता यांच्या डोक्यावर वार केले आणि घटनास्थळीच तिचा मृत्यू झाला.
या घटनेचे सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांच्या हाती लागले असून, त्यातून आरोपीची ओळख पटली. पोलिसांनी अतिशय जलद कारवाई करत अमरावती जिल्ह्यातील तिवसा गावातून अक्षयला अटक केली आहे. त्याची सखोल चौकशी सुरू असून, पुढील तपासासाठी त्याला नागपूरला आणण्यात आले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अक्षय आपल्या प्रेयसीबाबत अतीशय संशयी होता. तिचे इतर पुरुषांशी संवाद साधणे त्याला सहन होत नव्हते आणि त्या संशयातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.
हेमलता यांचा मूळ गाव हिंगणघाट असून, पतीच्या कोरोनामुळे झालेल्या निधनानंतर त्या मुलीसह नागपुरात वास्तव्यास होत्या. या दुर्दैवी घटनेनंतर परिसरातील रहिवाशांनी व सहकाऱ्यांनी हेमलता यांच्या मृत्यूनंतर तीव्र हळहळ व्यक्त केली आहे. तसेच, नागरिकांनी पोलिसांकडे परिसरात अधिक कडक सुरक्षाव्यवस्था तातडीने लागू करण्याची मागणी केली आहे.