(Image Source : Internet)
नागपूर :
जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये (Pahalgam) झालेल्या निर्घृण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदुर’द्वारे दहशतवाद्यांवर घातलेला घाव संपूर्ण जगाच्या लक्षात राहिला. पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ ठिकाणांवर अचूक हल्ले करून दहशतवाद्यांचे अड्डे नेस्तनाबूत करण्यात आले. देशभरातून याचे कौतुक होत असताना, मनसेचे अमित ठाकरे यांनी थेट आणि संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
हल्लेखोर मोकाट ,मग विजय कसला?
अमित ठाकरे म्हणाले, दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाले, पण ज्यांनी २५ निरपराध नागरिकांचा बळी घेतला, ते दहशतवादी अजूनही जिवंत आहेत. त्यांना ठेचून मारल्याशिवाय खरा न्याय मिळणार नाही. त्यांनी सुरक्षायंत्रणांवरही रोष व्यक्त करत विचारले. दहशतवादी देशात घुसले कसे? ही माहिती चुकलीच कशी?
युद्ध नको, पण उत्तर भीषण हवे-
राज ठाकरे यांच्या शांततेच्या भूमिकेचा उल्लेख करत अमित म्हणाले ,युद्ध अंतिम उपाय असावा, पण जेव्हा निष्पाप लोक मरतात, तेव्हा उत्तर निर्णायक असलंच पाहिजे. हल्लेखोरांना शोधा आणि संपवा. हे युद्ध नाही, हे न्यायाचं रण आहे, अशा शब्दांत अमित ठाकरेंनी सरकारकडे ठाम आणि थेट कारवाईची मागणी केली आहे.