(Image Source : Internet)
मुंबई :
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करत जोरदार प्रत्युत्तर दिलं. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या कारवाईबाबत संमिश्र भूमिका मांडत युद्धाची दिशा चुक असल्याचं मत व्यक्त केलं आहे.
“दहशतवाद्यांना कडक धडा शिकवणं आवश्यक आहेच, पण त्यासाठी युद्ध हा मार्ग योग्य नाही,” असं स्पष्ट करत ठाकरे म्हणाले, "अमेरिकेवर 9/11 च्या वेळी भीषण हल्ला झाला, तरी त्यांनी प्रत्यक्ष युद्ध न करता संबंधित दहशतवाद्यांचा थेट खातमा केला. आपणही तशीच ठोस, लक्ष्यित कारवाई करायला हवी."
हवाई हल्ले म्हणजे विषयांपासून लक्ष हटवणे-
राज ठाकरे यांच्या मते, एअर स्ट्राइक करून केवळ बाह्य शत्रूवर निशाणा साधणे म्हणजे मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष करणे. "हल्ला झाला त्या ठिकाणी सुरक्षेची व्यवस्था का नव्हती? कोम्बिंग ऑपरेशन करून देशात लपलेले दहशतवादी शोधणं हेच अधिक महत्त्वाचं आहे," असं त्यांनी ठामपणे सांगितलं.
तसेच, 'ऑपरेशन सिंदूर' या मोहिमेच्या नावाबद्दलही त्यांनी मतप्रदर्शन केलं. “नावामागे भावनिक दृष्टिकोन असला तरी यामागे ठोस कृती नसेल, तर त्याचा उपयोग नाही. देशांतर्गत समस्यांकडे दुर्लक्ष करून युद्धाकडे वळणं ही चिंतेची बाब आहे,” असं ते म्हणाले.
सरकारने वेळेवर पावलं उचलायला हवी होती-
या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या हालचालींबद्दलही राज ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केले. “हल्ल्याच्या काळात पंतप्रधान परदेश दौऱ्यावर होते. त्यानंतर त्यांनी प्रचार, उद्घाटन आणि इतर कार्यक्रमांना प्राधान्य दिलं. ही गंभीर स्थिती लक्षात घेता, अशा कार्यक्रमांना पुढे ढकलणं योग्य ठरलं असतं,” असा सूचक टोला त्यांनी लगावला.