भारताची नारीशक्ती उजळली; कर्नल सोफिया कुरैशीसहविंग कमांडर व्योमिका सिंग यांचे सोशल मीडियावर कौतुक

07 May 2025 17:17:38

Operation Sindoor Colonel(Image Source : Internet) 
नवी दिल्ली :
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारतीय लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी ठिकाणांवर भेदक कारवाई केली. या ऐतिहासिक मोहिमेची सविस्तर माहिती ७ मे रोजी भारतीय लष्कराच्या संयुक्त पत्रकार परिषदेत देण्यात आली. विशेष म्हणजे, या पत्रकार परिषदेत कर्नल सोफिया कुरैशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी देशवासीयांसमोर संपूर्ण माहिती ठामपणे मांडली.
 
हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा बळी गेल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर भारतीय सुरक्षा दलांनी अचूक नियोजनातून पाकिस्तानात घुसून २१ दहशतवादी केंद्रे नेस्तनाबूत केली.
 
महिला अधिकाऱ्यांची धडाडी आणि आत्मविश्वास पाहून देशभरातून कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. 'एकीकडे सैनिकी शिस्त आणि दुसरीकडे संयमित संवाद' – अशा शैलीत दोघींनी ऑपरेशनच्या यशस्वी तपशीलांची माहिती दिली.
 
सोशल मीडियावर "नारी शक्ती" आणि "सोफिया कुरेशी" हे हॅशटॅग्स ट्रेंडमध्ये आहेत. विशेष म्हणजे, कर्नल सोफिया या एक मुस्लिम महिला असून त्यांनी लष्करात दिलेलं योगदान आणि देशासाठी दाखवलेली निष्ठा सोशल मीडियावर विशेष चर्चेचा विषय ठरत आहे.
 
विंग कमांडर व्योमिका सिंग यांची शांत, ठाम आणि आत्मविश्वासपूर्ण उपस्थिती हीदेखील अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. लाखो भारतीयांनी ट्विटर, फेसबुक, एक्स आणि इंस्टाग्रामवर या दोघींचं कौतुक करत "भारतीय नारीशक्तीचा अभिमान" असल्याची भावना व्यक्त केली आहे.
Powered By Sangraha 9.0