भारताची पाकिस्तानवर एयर स्ट्राईक; नागपूरमध्ये 'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाचा जल्लोष

    07-May-2025
Total Views |
 
nagpur celebration
 (Image Source : Internet)
नागपूर :
भारताने पाकिस्तानातील दहशतवादी केंद्रांवर अचूक हवाई हल्ले करत 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा सडेतोड प्रतिउत्तर दिले. या कारवाईत जैश-ए-मोहम्मद, लश्कर-ए-तैयबा यांसारख्या संघटनांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले. कारवाईनंतर नागपूर शहरात नागरिकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत भारतीय सैन्याच्या शौर्याचे उत्स्फूर्त स्वागत केले.
 
भारतीय लष्कराने मंगळवारी रात्री १.०५ ते १.३० या वेळेत पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ प्रमुख ठिकाणांवर लक्षवेधी मिसाईल हल्ले केले. यामध्ये बहावलपूर, सियालकोट, मुरीदकेसह गुलपूर, कोटली, मुजफ्फराबाद अशा ठिकाणांचा समावेश होता. हल्ल्यानंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार, शंभराहून अधिक दहशतवादी ठार झाले असून अनेक जखमींवर इस्लामाबाद व रावळपिंडीतील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
 
नागपूरमध्ये या कारवाईची बातमी पोहोचताच अनेक नागरिक रस्त्यावर उतरले. तिरंगा हातात घेऊन त्यांनी सैन्याच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. विविध सामाजिक संस्था, युवक संघटना आणि सामान्य नागरिकांनी भारताच्या या निर्णायक भूमिकेचे स्वागत करत केंद्र सरकार आणि तीनही सैन्यदलांचे अभिनंदन केले.
 
दहशतवाद्यांच्या क्रौर्याचा भडकला रोष-
२२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला करत धर्म विचारून गोळ्या घालून २५ भारतीय व एका नेपाळी नागरिकाची हत्या केली होती. नवविवाहित जोडप्यांना लक्ष्य करत केलेल्या या क्रूर हत्याकांडानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. नागपूरकरांनीही सोशल मीडियावरून आणि निदर्शने करून पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलण्याची मागणी केली होती. 'ऑपरेशन सिंदूर'मुळे भारताने केवळ आपल्या शत्रूंना उत्तर दिले नसून, आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःचा निर्धार आणि शौर्य अधोरेखित केले आहे.