'ऑपरेशन सिंदूर'नंतर केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय; देशातील ९ विमानतळ तात्पुरते बंद, शेकडो फ्लाइट्स रद्द

07 May 2025 17:00:30
 
central govt
 (Image Source : Internet)
नवी दिल्ली :
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर केलेल्या कारवाईनंतर देशभरात उच्च पातळीवरील सतर्कता पाळली जात आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने १० मे सकाळी ५.२९ वाजेपर्यंत देशातील ९ विमानतळ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
 
या यादीत जम्मू, श्रीनगर, लेह, अमृतसर, जोधपूर, चंदीगड, भूज, राजकोट आणि जामनगर या संवेदनशील विमानतळांचा समावेश आहे. ही खबरदारी सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या सूचनांच्या आधारे घेण्यात आली आहे.
 
हवाई वाहतूक सेवेवर मोठा परिणाम-
या निर्णयाचा देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर थेट परिणाम झाला असून, IndiGo Airlines ने सुमारे १६० फ्लाइट्स रद्द केल्या आहेत. तर Air India ने वरील बंद विमानतळांवरील सर्व सेवा तात्पुरत्या थांबवल्या आहेत. दिल्ली विमानतळावरून देखील अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
 
सीमावर्ती राज्यांत अतिरिक्त सतर्कता-
जम्मू-कश्मीर, पंजाब आणि राजस्थानमधील अनेक भागांमध्ये शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून, नागरिकांना अनावश्यक हालचाली टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 
पाकिस्तानमध्येही विमान सेवा ठप्प-
भारतीय लष्कराच्या कारवाईनंतर पाकिस्ताननेही आपल्या देशातील हवाई वाहतूक अंशतः स्थगित केली आहे. इस्लामाबादहून होणाऱ्या अनेक उड्डाणांवर बंदी घालण्यात आली आहे. त्याशिवाय, ब्रिटिश एअरवेज, स्वीस इंटरनॅशनल आणि अमीरात यांसारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर टाळत पर्यायी मार्ग स्वीकारले आहेत.फ्रान्सने भारत-पाकिस्तान हवाई क्षेत्रातील उड्डाणांवर पुढील सूचना मिळेपर्यंत बंदी घातली आहे. त्यामुळे संपूर्ण दक्षिण आशिया क्षेत्रातील हवाई वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला आहे.
Powered By Sangraha 9.0