राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट; अंबाजोगाईत वीज पडून तरुणाचा मृत्यू

06 May 2025 13:41:13
 
Yellow alert
 (Image Source : Internet)
बीड:
राज्यात पुन्हा एकदा वातावरणाने अचानक पलटी घेतली असून, बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई परिसरात सोमवारी सायंकाळच्या वेळी वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाचा अनुभव आला. या हवामान बदलाचा परिणाम म्हणून मगरवाडी गावातील ३८ वर्षीय सचिन मधुकर मगर या युवकाचा वीज कोसळून मृत्यू झाला. त्यांच्या निधनामुळे गावात शोककळा पसरली आहे.
 
अचानक वाऱ्यांचा जोर आणि मुसळधार पाऊस
५ मे २०२५ रोजी सायंकाळी अंबाजोगाई शहरात आणि परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. अवघ्या अर्ध्या तासात झालेल्या पावसामुळे नाले भरून वाहू लागले, रस्त्यांवर पाणी साचले आणि वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. अनेक भागांत वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागला. बाजारपेठांतील दुकाने व टपऱ्यांवर नागरिकांनी पावसापासून संरक्षणासाठी आसरा घेतला.
 
गारपिटीसह झालेल्या पावसामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं चित्र समोर आलं असून, शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
 
राज्यात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रातील अनेक भागांत पुढील ४८ तास पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यात बीड, लातूर, परभणी व नांदेड जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भात नागपूर, वर्धा, अमरावती आणि चंद्रपूर जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
 
पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, कोल्हापूरमध्ये उष्णतेसोबतच दमट हवामान असून दुपारी हलकासा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये तापमान ३० ते ३४ अंश सेल्सिअसदरम्यान राहील, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
 
या जिल्ह्यांना यलो अलर्ट तर काहींना ऑरेंज अलर्ट
राज्यातील १५ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामध्ये ठाणे, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा, पालघर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ, बीड, अमरावती आणि भंडारा या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. बुलढाणा, अकोला आणि वाशिम वगळता इतर जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता दर्शवण्यात आली आहे.
Powered By Sangraha 9.0