देशभरात युद्धसराव; महाराष्ट्रातील अनेक शहरांचा समावेश, नागपूरला डावलले!

06 May 2025 14:18:51
 
War drills
 (Image Source : Internet)
मुंबई:
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने देशभरात सजगतेचा उपाय म्हणून युद्धजन्य परिस्थितीचा सराव करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना ७ मे रोजी 'मॉक ड्रिल' घेण्याचे आदेश दिले आहेत.
 
या सरावाचा उद्देश हवाई हल्ला किंवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी आणि यंत्रणांची तत्परता तपासणे हा आहे. मॉक ड्रिलमध्ये सायरन/भोंगे चाचणी, एकाच वेळी मोठ्या क्षेत्रात अंधार (क्रॅश ब्लॅकआऊट), महत्त्वाच्या ठिकाणांचे संरक्षण, तात्काळ स्थलांतर आणि कॅमोफ्लॉज तंत्राचा समावेश असणार आहे.
 
महाराष्ट्रातील या शहरांमध्ये होणार सराव-
मुंबई, उरण, ठाणे, पुणे, औरंगाबाद, भुसावळ, तारापूर, नाशिक, रायगड, रोहा-नागोठणे, रत्नागिरी, मनमाड, सिंधुदुर्ग, सिन्नर, थळ-वायशेत आणि पिंपरी-चिंचवड या शहरांमध्ये युद्धसराव राबवण्यात येणार आहे.
 
या सरावासाठी सैन्य, पोलीस, गृह रक्षक दल, आपत्ती व्यवस्थापन आणि स्थानिक प्रशासन या सर्वांची संयुक्त सहभाग असेल. युद्धजन्य संकटात नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी अशा सरावांचा उपयोग होतो, असे गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
 
नागपूरला का डावलले प्रश्नचिन्ह कायम-
या यादीत राज्याची उपराजधानी नागपूर मात्र समाविष्ट नाही. देशाच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या शहराचा युद्धसरावात समावेश न केल्यामुळे स्थानिकांमध्ये अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. याबाबत कोणतीही अधिकृत भूमिका अद्याप जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केलेली नाही.
 
७ मे रोजी आपल्याकडे सायरन, वाहतूक नियंत्रण, वीजपुरवठा खंडित होणे किंवा स्थलांतरासारख्या हालचाली झाल्यास ती केवळ सरावाचा भाग असल्याचे समजून घ्यावे. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या सूचना पाळाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0