(Image Source : Internet)
नवी दिल्ली :
देशात निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आपल्या जबाबदारीत अपयशी ठरले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून ती हाताळण्यास सक्षम नेत्यांची गरज आहे.
राऊत म्हणाले की, “पाकिस्तानच्या कुरापतींमुळे आपले २७ जवान शहीद झाले. मात्र, त्यांच्या बलिदानाचा प्रत्यक्ष बदलाही घेण्यात आलेला नाही. इतर देश जसे की अमेरिका, रशिया, किंवा इस्रायल हे अशा घटनांनंतर २४ तासांत कारवाई करतात, तर आपल्याकडे केवळ मूक समर्थन दिसते.”
त्यांनी सरकारच्या युद्धसरावावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत विचारले की, “या सरावामध्ये आम्हाला बंदुका मिळणार आहेत का? केवळ भोंगे वाजवून किंवा ब्लॅकआऊट करून युद्ध होत नाही. हे आम्ही १९७१ मध्ये अनुभवलं आहे. भारतीय जनता ही अज्ञानी नाही. ती सजग आहे आणि मानसिकदृष्ट्या मजबूत आहे.”
राऊतांनी केंद्र सरकारला आवाहन केलं की, काश्मीर प्रश्नावर खास संसद अधिवेशन बोलावून सर्वपक्षीय चर्चा घडवून आणावी. “देश हा आपला सगळ्यांचा आहे. त्यामुळे निर्णय घेताना फक्त सत्ताधाऱ्यांनीच नव्हे तर विरोधकांनाही विश्वासात घ्यावं,असे ते म्हणाले.
शेवटी राऊतांनी स्पष्ट शब्दांत मागणी केली की, गृहमंत्री अमित शाह हे त्यांच्या पदाला साजेसं नेतृत्व देऊ शकले नाहीत. येणाऱ्या संकटांना सामोरं जाण्यासाठी अधिक सक्षम व्यक्तीची गरज आहे. त्यामुळे त्यांना तात्काळ हटवण्यात यावं.