(Image Source : Internet)
नागपूर :
देशभरातील सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ७ मे रोजी मॉक ड्रिल घेण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केंद्र सरकारवर टीका केली असून, सरकारने जर युद्धाचे धोरण स्वीकारले, तर काँग्रेस पाठिंबा देईल, असे स्पष्ट केले आहे.
वडेट्टीवार म्हणाले, दहशतवादी अद्याप सापडलेले नाहीत. इतक्या मोठ्या प्रमाणावर स्फोटके देशात कशी आली, हे अजूनही स्पष्ट नाही. सरकारने सुरक्षेचा मुद्दा नशिबावर सोडल्याचे दिसते.
ते पुढे म्हणाले, जर सरकार युद्धाच्या दिशेने वाटचाल करत असेल, तर काँग्रेस त्यामागे उभी राहील. मात्र सध्या युद्ध मीडियामध्येच सुरू आहे. मीडियावर चर्चा करण्याऐवजी सरकारने प्रत्यक्ष कृती करावी.
मॉक ड्रिल केवळ औपचारिकतेपुरती मर्यादित न ठेवता, ती खरी सज्जता तपासण्यासाठी असावी, अशी सूचनाही त्यांनी केली. त्यांनी इंदिरा गांधींच्या १९७१ मधील निर्णयाचा उल्लेख करत, "त्या वेळी पाकिस्तानचे दोन तुकडे झाले होते, आणि भारताचे सैन्य लाहोरपर्यंत पोहोचले होते," असे सांगितले.त्यांच्या एका वादग्रस्त विधानावर विशेष लक्ष वेधले जात आहे. त्यांनी म्हटले,
भारताची १४० कोटी जनता जर सीमेवर उभी राहिली आणि लघुशंका केली, तरी पाकिस्तान वाहून जाईल.या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून, त्याला सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत.