नागपुरात शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यावर महिला उद्योजिकेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

    05-May-2025
Total Views |
 
Molesting
 (Image Source : Internet)
नागपूर :
शहरातील बजाजनगर पोलीस ठाण्यात शिंदेसेनेच्या एका पदाधिकाऱ्याविरोधात गंभीर स्वरूपाचे आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिला उद्योजिकेने (Female industrialist) तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी विनयभंग, फसवणूक, धमकी आणि अश्लील वर्तनाच्या कलमांखाली गुन्हा नोंदवला असून आरोपी सध्या फरार आहे.
 
मंगेश विजय काशीकर (रा.शंकर नगर) असे या राजकीय पदाधिकाऱ्याचे नाव असून, तो शिंदेसेनेचा संपर्क प्रमुख आहे. तक्रार करणारी महिला व्यावसायिक असून तिची काशीकरशी दोन वर्षांपूर्वी ओळख झाली होती. काशीकरचे बजाजनगर येथे एक हॉटेल असल्याचे सांगून त्याने महिलेची गुंतवणूक करून घेतली. हॉटेलचे व्यवस्थापन तिच्याकडे देण्याचे आश्वासन देत केवळ १० टक्के नफा आपल्याला देण्याची अट ठेवली होती.
 
महिलेने विश्वास ठेवून सुमारे दीड कोटी रुपये कर्जाच्या माध्यमातून गुंतवले, मात्र व्यवहाराबाबत कोणताही लेखी करार करण्यात आला नव्हता. काही काळाने महिलेला शंका येताच तिने विचारणा केली, पण काशीकरने उडवाउडवीची उत्तरे दिली. तपासादरम्यान समोर आले की, हॉटेलची मालकीच काशीकरकडे नव्हती.
 
नफा दिल्यानंतरही काशीकरने सतत पैशांची मागणी करत वाद निर्माण केला. जेव्हा महिलेने शांततेने व्यवहार मागितला, तेव्हा त्याने पिस्तुल दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. शिवाय, आपल्या राजकीय ओळखीचा वापर करून तिला खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकीही दिली.
 
तक्रारीनुसार, काशीकरने अश्लील भाषा वापरत महिलेसोबत गैरवर्तनही केले. अखेर त्रस्त होऊन पीडितेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.