नागपुरात एमडी ड्रग्जसह तिघे जेरबंद, साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

03 May 2025 19:17:04
 
Three arrested
 (Image Source : Internet)
नागपूर :
मानकापूर पोलिसांनी एमडी ड्रग्ज (MD drugs) तस्करी प्रकरणी तिघा जणांना अटक करून मोठा छापा टाकला आहे. वर्धा जिल्ह्यातून काही इसम नागपुरात अमलीपदार्थ खरेदीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईत ४.२४ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
 
गुप्त माहितीनुसार, लुंबिनी बुद्धविहार परिसरात दोन व्यक्ती ड्रग्ज व्यवहारासाठी येणार असल्याचे पोलिसांना समजले. तत्काळ कारवाई करत वसीम अहमद खान पठान आणि कार्तिक उर्फ जोंगा राजूसिंग बिलवाल यांना संशयावरून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या झडतीत ७५ हजार रुपयांची रोकड सापडली.
 
दोघांनी वर्ध्यातून ड्रग्ज खरेदी करून नागपूरमध्ये विक्रीसाठी आल्याची कबुली दिल्यानंतर, पोलिसांनी त्यांच्या मोबाईलचा वापर करत नागपूरमधील ड्रग्ज पुरवठादार आयुष अमृत मेश्राम याला बोलावले. ठरलेल्या ठिकाणी आल्यानंतर पोलिसांनी त्यालाही अटक केली. त्याच्याकडून २० ग्रॅम एमडी ड्रग्ज हस्तगत झाले, ज्याची किंमत अंदाजे २ लाख रुपये आहे.
 
या कारवाईत पोलिसांनी दोन दुचाकी, रोख रक्कम, मोबाइल फोन असा एकूण ४ लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली असून, पुढील तपास मानकापूर पोलिसांकडून सुरू आहे.
Powered By Sangraha 9.0