राष्ट्रवादीत बदल; शरद पवार लवकरच पक्ष संघटनेत नव्या नेतृत्वाची करणार नियुक्ती

03 May 2025 13:58:27
 
Sharad Pawar
 (Image Source : Internet)
मुंबई :
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षात लवकरच नेतृत्व पातळीवर मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार (Sharad Pawar) लवकरच पक्ष संघटनेत नव्या नेतृत्वाची नियुक्ती करणार असून, यासाठी वरिष्ठ नेत्यांशी सल्लामसलत पूर्ण झाली आहे.
 
सुनील भुसारा यांची वर्णी?
सध्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत, मात्र त्यांच्या जागी सुनील भुसारा यांची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. हा बदल जयंत पाटील यांना विश्वासात घेऊन करण्यात येणार असून, त्यांना पक्षात महत्त्वाची भूमिका दिली जाणार असल्याचे समजते.
 
रोहित पवारांना मोठी जबाबदारी?
आमदार रोहित पवार यांना संघटनात्मक सरचिटणीस पद देण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच, युवक प्रदेशाध्यक्षपदासाठी रोहित पाटील यांना संधी दिली जाऊ शकते. या बदलांच्या मागे रोहित पवार यांचा दीर्घकालीन आग्रह मान्य करण्यात आल्याचे बोललं जात आहे.गेल्या आठवड्याभरात मुंबईत शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पक्षाच्या कोअर टीमसोबत गुप्त बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आगामी फेरबदलांची रूपरेषा ठरली असून, संभाव्य पदाधिकाऱ्यांची यादी अंतिम करण्यात आली आहे. शरद पवार यांचा अंतिम होकार मिळाल्यानंतरच अधिकृत घोषणा केली जाणार आहे.
 
जयंत पाटील यांची भूमिका बदलणार?
गेल्या दोन महिन्यांपासून जयंत पाटील सातत्याने पक्षात बदलांची गरज असल्याचं सूचित करत होते. त्यांनी स्वतः सांगितले होते की, आठ वर्षांपासून ही जबाबदारी सांभाळतोय, आता नवीन नेतृत्व पुढे यायला हवं.
 
10 मेपूर्वी बदलांची शक्यता-
पक्षाचा वर्धापन दिन 10 मे रोजी साजरा होणार आहे. त्याआधीच हे बदल पूर्ण करावेत, असा आग्रह वरिष्ठ नेत्यांकडून करण्यात येतो आहे. यामुळे पक्षसंघटनेत नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे.
Powered By Sangraha 9.0