गोव्यातील श्री लैराई यात्रेत मोठी दुर्घटना; चेंगराचेंगरीत ७ मृत, ४० हून अधिक जखमी

    03-May-2025
Total Views |
 
Shri Lairai Yatra
 (Image Source : Internet)
शिरगाव, गोवा :
गोव्यातील शिरगाव येथे शुक्रवारी रात्री पार पडत असलेल्या श्री लैराई देवीच्या यात्रेत मोठा अपघात घडला. यात्रेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत सात जणांचा मृत्यू झाला असून ४० पेक्षा जास्त भाविक जखमी झाले आहेत. २० जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
 
यात्रेसाठी राज्यभरातून हजारो लोक आले होते. गर्दी अचानक वाढल्याने गोंधळ निर्माण झाला आणि त्यातून चेंगराचेंगरी झाली. स्थानिक प्रशासनाकडे पुरेशा व्यवस्था नसल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली, असा आरोप भाविक करत आहेत.
 
मुख्यमंत्र्यांचा तातडीचा हस्तक्षेप-
घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जखमींना पाहण्यासाठी रुग्णालयांना भेट दिली. त्यांनी डॉक्टरांना सर्व उपचार तत्काळ देण्याचे आदेश दिले. मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याचा विचारही सरकारकडून सुरू आहे. लैराई देवीची यात्रा ही गोव्यातील एक मोठी धार्मिक घटना आहे. दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात ही यात्रा होते. यंदाही लाखोंचा जनसागर शिरगावात जमला होता, पण गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात यंत्रणा अपयशी ठरली.
 
चौकशीची मागणी, जबाबदार कोण?
या घटनेनंतर प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. अपघात नेमका कसा घडला, जबाबदार कोण, आणि भविष्यात अशी दुर्दैवी घटना टाळण्यासाठी काय पावले उचलली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.