अभिनेत्री अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं 'इतका' मानधन; पहिल्या कमाईचाही केला खुलासा

    03-May-2025
Total Views |
 
 Alka Kubal
 (Image Source : Internet)
मुंबई :
मराठी चित्रपटसृष्टीतील एक अत्यंत लोकप्रिय नाव असलेल्या अलका कुबल (Alka Kubal) यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर लाखो प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. सध्या त्या त्यांच्या नवीन नाटकामुळे चर्चेत असल्या, तरी ‘माहेरची साडी’ या चित्रपटामुळे आजही त्यांची ओळख कायम आहे. या भावनिक चित्रपटात त्यांनी साकारलेली भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.
 
मात्र, या चित्रपटासाठी त्यांनी घेतलेलं मानधन ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसेल. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, ‘माहेरची साडी’साठी त्यांना केवळ १८ हजार रुपये मानधन देण्यात आलं होतं, तेव्हाही त्या बाहेर इतर सिनेमांसाठी ७५ हजार रुपये मानधन घेत होत्या.
 
सुरुवातीला अलका कुबल यांनी कमी मानधनामुळे हा सिनेमा नाकारला होता. परंतु निर्माते पितांबर काळे यांच्या आग्रहामुळे त्यांनी ही भूमिका स्वीकारली. या निर्णयाने त्यांचं संपूर्ण करिअर बदलून गेलं. अलका कुबल म्हणाल्या की, “त्या चित्रपटानंतर लोक मला नावाने नाही, तर ‘माहेरची साडी’मधली नायिका म्हणून ओळखायला लागले.”
 
त्यांनी त्यांच्या पहिल्या कमाईचाही उल्लेख केला. बालकलाकार म्हणून ‘नटसम्राट’ नाटकात काम करताना त्यांना एक नाइटसाठी २५ रुपये मिळायचे. पुढे ते वाढत ५०, मग ५००० रुपयांपर्यंत गेले. आणि शेवटी मोठ्या चित्रपटांसाठी ५० ते ७५ हजारांचं मानधन मिळू लागलं.
 
विशेष म्हणजे ‘माहेरची साडी’साठी दिग्दर्शक विजय कोंडके यांना सुरुवातीला अलका कुबल योग्य वाटत नव्हत्या. त्या भूमिकेसाठी भाग्यश्रीला विचारण्यात आलं होतं, पण तिने नकार दिल्यानंतर अलका कुबल यांचं नाव पुढे आलं.
 
आजही ‘माहेरची साडी’ चित्रपटामुळे अलका कुबल यांचं नाव घराघरात पोहोचलेलं आहे आणि त्या चित्रपटातील त्यांची भूमिका अजरामर ठरली आहे.