(Image Source-Internet)
मुंबई :
मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील ज्येष्ठ आणि लोकप्रिय अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांना त्यांच्या दीर्घकालीन योगदानाबद्दल 'पद्मश्री' या राष्ट्रपदकाने गौरविण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
सुमारे ४० वर्षांहून अधिक काळ रंगभूमी, चित्रपट व मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या अशोक सराफ यांनी २५० पेक्षा अधिक चित्रपटांत बहारदार भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या विनोदी शैलीने मराठीसह हिंदी प्रेक्षकांनाही अक्षरशः वेड लावले.
‘अशोकमामा’ म्हणून ओळख मिळवलेल्या सराफ यांनी आपली कारकीर्द मेहनतीने आणि सातत्याने घडवली आहे. 'पद्मश्री' पुरस्कार स्वीकारल्यानंतर भावना व्यक्त करताना ते म्हणाले, “हा सन्मान माझ्या संपूर्ण कारकिर्दीतील सर्वोत्तम गौरव आहे. प्रेक्षकांचे प्रेम, कुटुंबाचे पाठबळ आणि सरकारकडून मिळालेला आदर यामुळेच आज मी या ठिकाणी आहे. मी सर्वांचे आभार मानतो.”
या पुरस्कार वितरण सोहळ्याला त्यांच्या पत्नी आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्यासह कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. सराफ यांना मिळालेल्या या गौरवाबद्दल संपूर्ण कलाविश्वातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, अनेक कलाकारांनी सोशल मीडियावरून त्यांचे कौतुक केले आहे. सलील कुलकर्णी, तेजस्विनी पंडित, सायली संजीव यांसह अनेक कलाकारांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.