भारतीय खासदारांचे विमान मॉस्कोमध्ये उतरण्याच्या क्षणी युक्रेनचा ड्रोन हल्ला

23 May 2025 13:30:05
 
Ukrainian drone attack
  (Image Source- Internet)
मॉस्को (रशिया) :
पाकिस्तानमधील वाढत्या दहशतवादाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्दाफाश करण्यासाठी भारतीय खासदारांचे शिष्टमंडळ विविध राष्ट्रांच्या दौऱ्यावर आहे. मात्र, या शिष्टमंडळाचा रशिया दौरा सुरू होत असतानाच एक अत्यंत धक्कादायक घटना घडली.
 
भारतीय खासदारांचे विमान रशियाच्या राजधानीत असलेल्या मॉस्को विमानतळावर उतरण्याच्या तयारीत असताना युक्रेनकडून अचानक ड्रोन हल्ला करण्यात आला. यामुळे विमानतळावरील सर्व उड्डाणे आणि लँडिंग्स तात्काळ थांबवण्यात आली. परिणामी, भारतीय शिष्टमंडळाच्या विमानाला हवेतच थांबावे लागले.
 
कोण होते शिष्टमंडळात?
या शिष्टमंडळात द्रमुक खासदार कनिमोळी, समाजवादी पक्षाचे खासदार राजीव राय, राजदचे प्रेमचंद गुप्ता, कॅप्टन ब्रिजेश, अशोक कुमार मित्तल तसेच भारताचे माजी राजदूत मंजीव सिंग पुरी यांचा समावेश आहे.
 
हल्ल्याचा परिणाम आणि सुरक्षित लँडिंग-
ड्रोन हल्ल्यानंतर मॉस्कोतील प्रमुख विमानतळांवर तात्काळ विमान वाहतूक बंद करण्यात आली. हल्ला झाल्याच्या काही वेळानंतर परिस्थिती नियंत्रणात येताच भारतीय खासदारांचे विमान सुरक्षितपणे लँड करण्यात आले. त्यानंतर मॉस्कोमधील भारतीय राजदूत विनय कुमार यांनी शिष्टमंडळाचे स्वागत केले.
 
पाकिस्तानच्या दहशतवादावर होणार चर्चा-
भारतीय खासदार रशियन उच्चपदस्थ अधिकारी, संसदेतील प्रतिनिधी आणि तज्ज्ञांशी चर्चा करत पाकिस्तानमधील दहशतवादी हालचाली, त्याचा जागतिक सुरक्षेवर होणारा परिणाम आणि भारताची भूमिका यावर सविस्तर माहिती देणार आहेत.
 
पुतिन यांची शंका खरी ठरली?
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या संभाषणात असे म्हटले होते की, जेव्हा जेव्हा कोणतेही शासकीय शिष्टमंडळ रशियाला भेट देते, तेव्हा युक्रेन मुद्दाम मॉस्कोवर ड्रोन हल्ले घडवतो. या वक्तव्याची आजच्या घटनेने पुन्हा एकदा आठवण करून दिली आहे.दरम्यान, युक्रेनकडून या हल्ल्यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
Powered By Sangraha 9.0