वैष्णवी प्रकरणातील फॉर्च्युनर जप्त; लग्नात अजित पवारांच्या हस्ते दिली होती गाडीची चावी

    23-May-2025
Total Views |
 
Vaishnavi case Ajit Pawar
  (Image Source- Internet)
पुणे :
वैष्णवी (Vaishnavi) हगवणे आत्महत्या प्रकरणातील चौकशी दरम्यान एक नवा धक्का बसवणारा तपशील समोर आला आहे. बावधन पोलिसांनी हगवणे कुटुंबाच्या ताब्यातील MH 14 KU 2022 क्रमांकाची टोयोटा फॉर्च्युनर ही आलिशान गाडी जप्त केली आहे. विशेष म्हणजे, ही गाडी वैष्णवीच्या विवाहप्रसंगी तिच्या वडिलांनी "सुखासाठी" दिली होती आणि या गाडीची चावी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विवाह मंडपात स्टेजवर सुपूर्त करण्यात आली होती, अशी माहिती आता उघडकीस आली आहे.
 
ही टॉप-एंड फॉर्च्युनर गाडी सध्या कायदेशीर वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. गाडी खरेदी कोणी केली, नोंदणी कोणी केली आणि वापर कोणी करत होता – यावर सुस्पष्टता नसल्याने प्रकरण न्यायालयात पोहोचले आहे. न्यायालयाचा निर्णय झाल्यानंतरच पुढील कारवाई होणार असल्याचे बावधन पोलिसांनी स्पष्ट केले.
 
गाडीच नव्हे, इतर मौल्यवान वस्तूंवरही चौकशी
फक्त गाडीच नव्हे, तर लग्नावेळी ५० तोळे सोने, चांदीची भांडी आणि इतर महागड्या वस्तू वैष्णवीच्या वडिलांनी हगवणे कुटुंबाला दिल्याचेही चौकशीत समोर आले आहे. यामुळे हुंडा प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे झाले असून, त्याचा थेट संबंध वैष्णवीच्या आत्महत्येशी जोडला जात आहे.
 
या प्रकरणात राजकीय स्तरावरही हालचाली सुरू असून, अजित पवार यांच्या हस्ते दिलेली गाडीची चावी ही बाब चर्चेचा विषय ठरली आहे. पोलिसांकडून आर्थिक व्यवहारांचे, राजकीय संपर्काचे आणि हुंड्याच्या स्वरूपातील देणग्यांचे बारकाईने विश्लेषण केले जात आहे. प्रत्येक पुरावा तपासणीच्या कसोटीवर लावला जात असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याचा पोलिसांचा निर्धार आहे.