केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा नागपूर दौरा २५ मे रोजी; प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू

    23-May-2025
Total Views |
 
Amit Shah visit to Nagpur
(Image Source- Internet) 
नागपूर :
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) येत्या २५ मे रोजी नागपूरच्या दौऱ्यावर येणार असून, त्यांच्या उपस्थितीत शहरात काही महत्त्वपूर्ण विकास प्रकल्पांचे भूमिपूजन होणार आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागपूर प्रशासनाने तयारीला गती दिली आहे.
 
शहा २५ मे: रोजी संध्याकाळच्या सुमारास नागपूरमध्ये दाखल होतील. रात्री विश्रांती घेतल्यानंतर, दुसऱ्या दिवशी म्हणजेच २६ मे रोजी सकाळी चिंचोली येथे उभारण्यात येणाऱ्या ‘नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी’च्या कामाचा शुभारंभ ते करतील. यासोबतच, राष्ट्रीय कर्करोग संस्थानात उभारल्या जाणाऱ्या ‘स्वस्ति निवास’ या निवासी प्रकल्पाचाही शिलान्यास त्यांच्याच हस्ते होणार आहे.
 
प्रशासनाकडून जोरदार तयारी, आयुक्तांची आढावा बैठक-
या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनाची महत्त्वपूर्ण बैठक झाली. विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत सर्व संबंधित यंत्रणांना वेळेत तयारी पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले.
 
अमित शहा यांचा हा दौरा नागपूरसाठी विशेष महत्त्वाचा मानला जात असून, शहराच्या विकासाशी निगडित प्रकल्पांना गती देण्यासाठी आणि आरोग्य सुविधांच्या विस्तारासाठी ही भेट निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.