वैष्णवी प्रकरणावरून मोठी कारवाई; राष्ट्रवादीकडून राजेंद्र हगवणे यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी,अजित पवारांचे आदेश

    22-May-2025
Total Views |
 
Vaishnavi case
 (Image Source- Internet)
पुणे:
मुळशी तालुक्यातील वैष्णवी (Vaishnavi) हगवणे आत्महत्येच्या प्रकरणाने राज्यभरात खळबळ माजवली असताना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाने कठोर पावले उचलली आहेत. वैष्णवीच्या सासऱ्यांविरोधात कारवाई करत, माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे यांना पक्षाच्या सर्व जबाबदाऱ्यांवरून हटवण्यात आले असून, त्यांची पक्षातूनही हकालपट्टी करण्यात आली आहे.
 
पोलिस तपासात समोर आले आहे की, वैष्णवीवर सासरच्यांकडून सातत्याने मानसिक आणि शारीरिक त्रास होत होता. या छळाला कंटाळून तिने आपले आयुष्य संपवले. तिच्या मृत्यूनंतर पती शशांक, सासू लता आणि नणंद करिश्मा यांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांची पोलिस कोठडी २६ मेपर्यंत वाढवली आहे. दरम्यान, सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील सध्या पोलिसांच्या नजरेआड आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके काम करत आहेत.
 
राष्ट्रवादीकडून तीव्र प्रतिक्रिया-
पक्षाचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी सांगितले की, “राजेंद्र हगवणे यांच्या कृत्यामुळे पक्षाची प्रतिमा मलीन झाली असून, अशा व्यक्तीला पक्षात स्थान नाही. म्हणून त्यांची सर्व पदांवरून हकालपट्टी करण्यात आली आहे.”
 
अजित पवारांचा ठाम आदेश-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणी थेट हस्तक्षेप करत पुणे पोलीस आयुक्तांना फोनवरून आदेश दिले असून, “राजेंद्र हगवणे यांना तत्काळ अटक करावी आणि कठोर कारवाई व्हावी,असे निर्देश त्यांनी दिले आहेत. अजित पवार यांची यापूर्वीही भूमिका स्पष्ट राहिली आहे. पक्षातील कोणी चुकीच्या वाटेवर गेल्यास त्याला वाचवू नका.
 
शवविच्छेदनात मारहाणीचे स्पष्ट पुरावे-
पोस्टमॉर्टेम अहवालात वैष्णवीच्या शरीरावर मारहाणीचे जखमेचे निशाण स्पष्टपणे आढळले असून, तिच्या वडिलांनी हत्येचा संशय व्यक्त केला आहे. त्यानुसार, शशांकने तिला लोखंडी पाइपने मारहाण केल्याचा आरोप आहे.
 
सामाजिक संताप व न्यायाची मागणी-
ही घटना उघडकीस आल्यानंतर महिला संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि जनतेतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. वैष्णवीला न्याय मिळावा आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी एकमुखी मागणी जोर धरत आहे.