छत्तीसगडच्या जंगलात नक्षलवाद्यांविरुद्ध मोठी मोहीम; चकमकीत 26 नक्षलवादी ठार, एक जवान शाहिद

    21-May-2025
Total Views |
 
Naxalites
 (Image Source : Internet)
छत्तीसगड :
छत्तीसगडमधील (Chhattisgarh) अबुझमाडच्या जंगलात सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरुद्ध मोठी कारवाई उचलली असून, आतापर्यंत 26 नक्षलवादी ठार मारण्यात आले आहेत. या कारवाईदरम्यान एक जवान शहीद झाला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
 
ही चकमक आज सकाळी सुरू झाली असून, जिल्हा राखीव पोलीस बल (DRG) च्या नारायणपूर, दंतेवाडा, विजापूर आणि कोंडागाव पथकांनी एकत्रितरित्या ही मोहीम राबवली आहे. अबुझमाडच्या माड भागात नक्षल गटाच्या हालचालींबाबत विशिष्ट माहिती मिळाल्यानंतर ही मोठी कारवाई करण्यात आली.
 
पोलिस अधीक्षक प्रभात कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या जंगल परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे आणि नक्षलवाद्यांच्या मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. या कारवाईत नक्षल चळवळीतील महत्त्वाचा म्होरक्या व जनरल सेक्रेटरी बसव राजू मारला गेला आहे, अशी प्राथमिक माहिती आहे. त्याच्यावर एक कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते आणि तो अनेक हिंसक कारवायांमध्ये सक्रिय होता.
 
नक्षलविरोधी अभियानाला मोठे यश-
केंद्र सरकारने 2026 पर्यंत देश नक्षलमुक्त करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्या पार्श्वभूमीवर छत्तीसगडमध्ये सातत्याने मोहीम राबवली जात आहे. याआधी देखील बिजापूर जिल्ह्यातील डोंगराळ भागात 21 दिवस चाललेल्या कारवाईत 31 नक्षलवादी मारले गेले होते, तर 150 हून अधिक बंकर उद्ध्वस्त करण्यात आले होते.
 
त्याचप्रमाणे, स्थानिक पातळीवर शस्त्रे बनवणाऱ्या नक्षलवाद्यांच्या कारखान्यावरही धाड टाकून मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली होती. ही मोहीम छत्तीसगडमधील नक्षल समस्येच्या मुळावर घाला घालण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल मानली जात आहे. सुरक्षा दलांची हिंमतीची कारवाई आणि गुप्त माहितीवर आधारित अचूक रणनीती यामुळे नक्षल गटांना मोठा फटका बसला आहे.