ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन

20 May 2025 12:04:27

Dr Jayant Narlikar
 (Image Source : Internet)
 
प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर (Dr Jayant Narlikar) यांचे निधन झाल्याची दुःखद बातमी समोर आली आहे. पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी झोपेत असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८६ वर्षांचे होते.
 
डॉ. नारळीकर हे जागतिक ख्यातीचे खगोलशास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म १९३८ साली कोल्हापुरात झाला होता. त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून पीएच.डी. पदवी मिळवली आणि ख्यातनाम वैज्ञानिक सर फ्रेड हॉईल यांच्या मार्गदर्शनाखाली “हॉयल-नारळीकर गुरुत्व सिद्धांत” विकसित केला.
 
भारत सरकारने त्यांच्या वैज्ञानिक योगदानासाठी त्यांना पद्मभूषण (१९६५) आणि पद्मविभूषण (२००४) या राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित केले. त्यांनी ‘आयुका’ (Inter-University Centre for Astronomy and Astrophysics) या संस्थेची स्थापना केली आणि संचालकपदाची जबाबदारी सांभाळली.
 
त्यांच्या पत्नी, प्रख्यात गणितज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांचे निधन जुलै २०२३ मध्ये पुण्यात झाले होते. त्या दीर्घकाळ कर्करोगाशी झुंज देत होत्या.
 
डॉ. नारळीकर यांच्या निधनामुळे विज्ञान क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
Powered By Sangraha 9.0